दाभा परिसरात बिबट्या आला !
नागपूर : गोरेवाडा वनपरिक्षेत्राला लागून असलेल्या दाभा न्यू शांतीनगर परिसरात सोमवार (२५ जुलै) च्या रात्री ९.१४ वाजताच्या सुमारास बिबट्या आढळल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. शनिवार (१६ जुलै) च्या पहाटे ३ वाजता सुमारास हाच बिबट्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला होता.
शांतीनगर हा परिसर गोरेवाडा वनपरिक्षेत्राच्या भिंतीला लागून आहे. गेल्या अनेक दिवसापासून परिसरात बिबट्याचा वावर आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी वनविभागाला कळविले. मात्र अध्यापही वनविभाग गंभीर नसल्याचे दिसते. पत्रकार श्याम देशकर हे न्यू शांतीनगर येथे राहतात. त्यांचे घर गोरेवाडा जंगलाच्या भिंतीला लागूनच आहे. देशकर यांच्या पत्नीला व शेजारी दिनेश बनकर यांना सोमवार रात्री ९.१४ वाजताच्या सुमारास भल्ला मोठा बिबट्या आढळला.
परिसरात काळोख असल्याने बिबट्याला मोबाईल फोनच्या कैमेऱ्यात कैद करता आले नाही. या घटने संदर्भात गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक शतानिक भागवत,यांच्याशी फोन वरुन संपर्क साधला. त्यांनी इतर अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा सल्ला दिला. मात्र दाभा शांतीनगर परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे, हे विशेष. वनविभागाने बिबट्याला पिंजराबंद करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
.