अल्पवयिन नातूने केली आजीची हत्या
बुलढाणा : अल्पवयिन नातूने आजीची हत्या केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव उमरा लासूरा येथे उघडकीस आली आहे. सख्या बहिणीच्या नातवाने मित्राच्या मदतीने आजीचा खुन केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मृतक आजीचे वय ६५ वर्ष आहे. दोन्ही आरोपी अल्पवयिन असून पोलीसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे.
खामगाव तालुक्यातील उमरा लासुरा येथील कमलबाई जनार्दन सोनोने या वृध्द महिलेची शुक्रवारी गळादाबून निर्घुन हत्या करण्यात आली. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आरोपी हा नात्यातीलच असावा असे काही सुगावे खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे निरीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या हाती लागले.
त्यादिशेने पोलिसांनी तपास सुरू केला असता वृध्द महिलेच्या बहिणीच्या नातवाने आपल्या अल्पवयीन मित्राच्या मदतीने आजीचे हत्याकांड घडविल्याचे समोर आले. आरोपींना ग्रामीण पोलिसांनी रविवारी अटक केली. दोन्ही आरोपी अल्पवयीन असल्यामुळे दोघांना बाल न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
आईने मामाला देण्यासाठी दिलेले पैसे खर्च झाल्यामुळेच अल्पवयिन मुलाने आपल्या मावस आजीची हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. आरोपीला दारू पिण्याची सवय असून, गत काही दिवसांपासून दोन्ही परिवारात संपत्तीवरून वाद सुरू होता. रागाच्या भरात नातवाने आजीची हत्या केली. खामगाव पोलीस पुढील तपास करीत आहे.