ओगावा सोसायटी कामठी ला राज्यस्तरीय शाहु-फुले-आंबेडकर पुरस्कार जाहीर
मुंबई येथे मंगळवार १० जुन ला पुरस्कार वितरण सोहळा
कामठी : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राज्यस्तरीय शाहु-फुले-आंबेडकर पारितोषिके करिता ओगावा सोसायटी कामठी या संस्थेची निवड करण्यात आली आहे. मुंबई येथे मंगळवार दिनांक १० जुन २०२५ रोजी पुरस्कार वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.
ओगावा सोसायटी ची स्थापना माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी १९९६ साली केली होती. ओगावा सोसायटी ने विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस ची निर्मिती केली. ड्रॅगन पॅलेस हे शांती, मैत्री व मानव कल्याणकारी विचाराचे केंद्र म्हणुन जगतप्रसिद्ध आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र, ड्रॅगन पॅलेस विपस्सना मेडीटेशन सेंटर, ड्रॅगन इंटरनॅशनल स्कूल, दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्राची निर्मिती ड्रॅगन पॅलेस परिसरात केली आहे. वर्ष भर अनेक शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबविल्या जातात. ॲड. सुलेखाताई कुंभारे यांच्या नेतृत्वात ओगावा सोसायटी पूर्ण पणे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला समर्पित आहे. ओगावा सोसायटीच्या कार्याची दखल घेत शाहु-फुले-आंबेडकर पुरस्कार देण्याचा निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालयाने घेतला आहे.