ग्रंथोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद; वाचन संस्कृती जपण्याचे आवाहन
‘ए.आय.’ काळातील वाचन संस्कृतीचे वर्तमान’ या विषयावर आज परिसंवाद
नागपूर : ग्रंथ हे जीवनाचा अविभाज्य घटक असून ग्रंथवाचनामुळे माणसाचे जीवन घडते. आजच्या डिजिटल युगात नवीन पिढीचा कल मोबाईलकडे वाढला असला तरी खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्व घडविण्याचे सामर्थ्य ग्रंथांमध्येच आहे. ग्रंथ हे केवळ पुस्तक नसून ते जीवनाला नवा आयाम देतात. त्यामुळे ग्रंथालयांची वाढ आणि ग्रंथविक्रीसाठी ग्रंथोत्सव ग्रामीण भागातही आयोजित होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संध्या पवार यांनी केले.

दोन दिवसीय नागपूर ग्रंथोत्सव-2025 चे आयोजन उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय मुंबई आणि वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या स्वातंत्र्य भवन येथे करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय नागपूर-अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोठेकर, संस्थेचे संचालक डॉ. मनोहर कुंभारे, प्र-जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिनाक्षी कांबळे तसेच ग्रंथपाल रामदास साठे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीने करण्यात आली.
यावेळी बोलताना डॉ. पवार यांनी ग्रंथप्रेमातून ग्रंथांची जोपासना करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. विविध उदाहरणांद्वारे त्यांनी ग्रंथांचे महत्त्व स्पष्ट केले. ग्रंथचळवळ लोकाभिमुख झाल्यास समाजाची साथ मिळेल आणि तेव्हाच खरा ग्रंथोत्सव साजरा होईल, असे त्यांनी नमूद केले. “वाचाल तर वाचाल” असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
प्रमुख उद्घाटक डॉ. गणेश मुळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ग्रंथ लिहिणारे, प्रकाशित करणारे आणि वाचणारे या तिन्ही घटकांची जोपासना करणे आवश्यक आहे. उत्तम ग्रंथालयांचा लाभ समाजाने घेतला पाहिजे. पुस्तके वाचली नाहीत तर मानवी मनाची जडणघडण परिपक्व होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रंथोत्सवामुळे समाजात वाचन संस्कृतीबद्दल आपुलकीची भावना निर्माण होते, असे मत महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोठेकर यांनी व्यक्त केले. सध्या विविध ठिकाणी आयोजित होणाऱ्या बुक फेस्टिव्हलमुळे नवीन पिढीत वाचनाची आवड निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, अभ्यासिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये सामर्थ्य निर्माण करून आपले जीवन सुकर केले आहे. त्यामुळे ग्रंथालयांचे महत्त्व अधिक वाढले आहे. ग्रंथालयांच्या वृद्धीसाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असून त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. ग्रंथालयांची प्रगती व्हावी यासाठी त्यांना शाळांशी जोडण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात बोलताना डॉ. मनोहर कुंभारे यांनी सांगितले की, ग्रंथोत्सवामुळे वाचन संस्कृतीला चालना मिळते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे “एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या; एक भूक भागवते तर दुसरे ज्ञान देते.” ज्ञानवृद्धी करणे हेच ग्रंथोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आदर्श ग्रंथपालाचा व वाचन संस्कृती जीवंत ठेवल्याबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र-जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिनाक्षी कांबळे यांनी केले.
ग्रंथोत्सवात विविध पुस्तकांचे स्टॉलला मान्यवरांनी भेट देऊन पाहणी केली. वाचन संस्कृतीविषयक उपक्रम आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
‘ए.आय.’ काळातील वाचन संस्कृतीचे वर्तमान’ या विषयावर आज परिसंवाद
महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाद्वारे आयोजित ‘ नागपूर ग्रंथोत्सव- 2025’ मध्ये उद्या शनिवारी सकाळी ११ ते १ या वेळेत ‘ए.आय.’ काळातील वाचन संस्कृतीचे वर्तमान’ या विषयावर वसंतराव नाईक कला व समाज विज्ञान संस्थेत एका विशेष परिसवांदाचे आयोजन करण्यात आले आहे.
अध्ययनासाठी व ज्ञान ग्रहणासाठी वाचन हे अतिशय महत्त्वाचे कौशल्य आहे. जिथे वाचन होते तिथे विचार निर्माण होतात आणि हेच विचार आपल्याला ध्येय ठरवायला आणि गाठायला मदतही करतात.परंतु, सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृती धोक्यात आली आहे. ‘ए.आय.’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेने वाचन संस्कृतीची व्याख्याच बदलून टाकली आहे. वाचनाच्या दृष्टीने या संक्रमणाच्या काळात वाचन संस्कृतीचे वर्तमान व भविष्य कसे असेल यावर बरीच ग्रंथालय तज्ज्ञ डॉ. अरुंधती वैद्य, लेखक व मुक्त पत्रकार शफी पठाण, साहित्यिक विजय सावंत व साहित्यिक प्रसेनजीत गायकवाड आपले विचार मांडणार आहेत. वाचन संस्कृती टिकवण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या या परिसांवादाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधीकारी मीनाक्षी कांबळे यांनी केले आहे.


