मुंबई, दि. १५ : भारत निवडणूक आयोगाने आज राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून महाराष्ट्र शासनाच्या १५ जून २०२२ रोजीच्या राजपत्रात पुनर्प्रसिद्ध करण्यात आले आहे. राष्ट्रपती निवडणूक-२०२२ च्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची बुधवार, दि. २९ जून २०२२ अंतिम तारीख असणार आहे. नामनिर्देशन पत्राची गुरुवार दि. ३० जून २०२२ रोजी छाननी करण्यात येणार आहे. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख शनिवार दि. २ जुलै २०२२ राहणार आहे. तसेच आवश्यकता असल्यास सोमवार दि. १८ जुलै २०२२ रोजी निवडणूक होईल, असे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ऋतुराज कुडतरकर यांनी कळविले आहे.