पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे जिल्हा नियोजन समिती बैठकीत निर्देश
नागपूर: नागपूर महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील सहा विधानसभा मतदारसंघात सीबीएसई इंग्रजी माध्यम शाळा आणि विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर डिजीटल अध्ययन केंद्र सुरु करा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जिल्हा नियोजन कार्यकारी समितीच्या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यात उच्च रक्तदाब व मधुमेहाचे सहव्याधी रुग्ण वाढत असल्यामुळे त्यांच्यावरील उपचारासाठी औषधी आणि इतर साहित्यांचे वाटप करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित जिल्हा नियोजन कार्यकारी समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
याप्रसंगी खासदार कृपाल तुमाने, आमदार ऍड. अभिजीत वंजारी, आमदार राजू पारवे, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हाधिकारी आर. विमला, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक विजय मगर, कार्यकारी समितीचे सदस्य, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. राऊत म्हणाले, युपीएससी, एमपीएससी या स्पर्धात्मक परीक्षेत जिल्हयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना यश मिळण्यासाठी प्रशासकीय स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्राचे डिजिटलायझेशन करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी चांगले वातावरण मिळण्याच्या उद्देशाने स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्रातील वसतिगृहात उत्तम सुविधा निर्माण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्हयात विधानसभानिहाय स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्रे सुरु करून ती मुख्य केंद्राला जोडण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
नवी दिल्लीच्या धर्तीवर जिल्ह्यात “स्मार्ट स्कुल ” सुरु करण्यासोबतच गडचिरोलीप्रमाणे नाविन्यपूर्ण योजनेतून “मॉड्युलर लेबर रूम” अत्याधुनिक प्रसूतीगृह कक्ष उभारण्याचा प्रस्ताव सादर करा, अशी सूचना पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाला केली. विजेची बचत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील सर्व शाळांमध्ये सौर ऊर्जेची उपकरणे बसवा, त्याबाबतचा प्रस्ताव सादर करून संबंधित सर्व यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय साधून काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यांचे सौर उर्जेवर विद्युतीकरण व डिजिटलायझेशन करून स्मार्ट पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली.
पाणीपुरवठा विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या जलजीवनच्या सर्व नळ योजना सौर उर्जेवर कार्यान्वित करण्यासह पुण्याच्या धर्तीवर सर्व नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे निर्देश त्यांनी दिले. कौशल्य विकासातून रोजगार निर्मिती करून बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लावा, महास्वयंम पोर्टलवर सर्व उद्योग, व्यवसायांची नोंदणी करा, व्यवसायाभिमुख प्रशिक्षणावर भर द्या, प्लेसमेंटनुसार निधी वाटप करा, स्थानिक लोकांना व्यवसायात प्राधान्याने सामावून घ्या, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या. नगरपालिका व महापालिकेची निवडणूक जवळ असल्याने मुद्देनिहाय व यॊजनानिहाय सर्व प्रस्ताव सादर करा, विकास निधीतून केल्या जाणाऱ्या कामांच्या भूमिपूजनासाठी पालकमंत्री अथवा लोकप्रतिनिधींना आमंत्रित करा, महिलांना शिलाई मशीन, शेतकऱ्यांना शेळी, दुधाळ जनावरांचे वाटप करण्याची योजना राबवा, असे निर्देशही डॉ. राऊत यांनी दिले.