रविचंद्रन अश्विनला कोरोनाची लागण भारतीय कसोटी संघासोबत इंग्लंडला जाऊ शकला नाही
बंगळुरू : भारताचा प्रमुख ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे अश्विन ला इंग्लंड दौऱ्यासाठी गेलेल्या भारतीय संघासोबत जाता आले नाही . भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय ) सूत्राने मंगळवारी याबाबत माहिती दिली .
भारतीय संघ १ ते ५ जुलैदरम्यान एजबस्टन येथे गेल्यावर्षी स्थगित करण्यात आलेला इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना खेळणार आहे . एकीकडे भारताचा प्रमुख खेळाडूंचा समावेश असलेला संघ इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी सज्ज होत आहे , तर दुसरीकडे भारताचा दुसऱ्या श्रेणीचा संघ व्ही . व्ही . एस . लक्ष्मणच्या प्रशिक्षक पदाखाली आयर्लंड दौऱ्यावर जाईल . आयर्लंडविरुद्धच्या दोन टी -२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ २३ किंवा २४ जूनला डब्लिनसाठी रवाना होईल . भारताचा हा संघ २६ आणि २८ जूनला डब्लिन येथे आयर्लंडविरुद्ध टी -२० लढत खेळेल . अश्विन सध्या विलगीकरणात आहे . कोरोना नियमांचे सर्व पालन • करूनच तो भारतीय संघात प्रवेश करेल . भारतीय संघ याआधीच १६ जूनला इंग्लंडला रवाना झाला . बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की , ‘ अश्विन संघासोबत इंग्लंडला रवाना झाला नाही . कारण , संघ इंग्लंडला जाण्याआधी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीमध्ये अश्विन पॉझिटिव्ह आढळला , पण आम्हाला आशा आहे की , १ जुलैपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्याआधी तो पूर्णपणे बरा होईल ; परंतु लिसेस्टरशायर विरुद्धच्या सराव सामन्यात त्याचे खेळणे अनिश्चित आहे . ‘ सामन्याच्या तयारीसाठी तमिळनाडू क्रिकेट संघटनेच्या लीग स्पर्धेत खेळला होता . या सामन्यात त्याने २० षटके गोलंदाजी केली होती . भारतीय संघ सध्या गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली लिस्टर येथे सराव करत आहे . एजबस्टन येथील कसोटी सामन्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी -२० सामन्यांची मालिका खेळेल .