शारीरीक व मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यास
योग हे एकमेव प्रमुख साधन- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबीर व जनजागृती कार्यक्रम
नागपूर : मनुष्य जीवनामध्ये सात सुख असून त्यापैकी एक सुख म्हणजे निरोगी शरीर आहे. शारीरीक व मानसिकदृष्टया निरोगी राहण्यास योग हे एकमेव प्रमुख साधन असून जीवनात येणाऱ्या शारीरीक व मानसिक व्याधी नियमित योगसाधनेद्वारे नियंत्रित करता येवू शकतात, असे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एस.बी. अग्रवाल यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले.
जिल्हा विधी सेवा प्रधिकरण व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी 7 वाजता आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने योग शिबीर व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा न्यायालय येथील परिसरात आयोजित करण्यात आला. जिल्हा न्यायाधीश(वर्ग-2) जे.पी झपाटे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष कमल सतुजा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जयदिप पांडे यावेळी उपस्थित होते.
या शिबीरास न्यायीक अधिकारी, अधिवक्ता, पॅनल अधिवक्ता, विधी स्वयंसेवक व न्यायीक कर्मचारी यांचा सहभाग लाभला.
योग शिबीर व जनजागृती कार्यक्रमास योग प्रशिक्षक व मार्गदर्शक मधुकर पराते यांनी उपस्थित मान्यवरांना योगाचे महत्व सांगून योग आसनाचे प्रशिक्षण दिले. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. या योग शिबीरात 105 सदस्यांनी सहभाग घेतला.
प्रास्ताविकात जयदिप पांडे यांनी योगशक्ती – रोगमुक्ती व मानवी जीवनात योगाचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन जयदिप पांडे यांनी तर उपस्थितांचे आभार जिल्हा वकील संघाचे सचिव नितीन देशमुख यांनी मानले.