जि.प.उपाध्यक्ष व पंचायत समिती उपसभापतींच्या निवडणूका पुढे ढकलल्या
नागपूर : 16 जुलै रोजी होणारी जि.प.उपाध्यक्ष व पंचायत समित्यांच्या उपसभापतींची निवडणूक पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
आता विद्यमान सभापती, उपाध्यक्ष व अन्य पदाधिकारी तसेच अध्यक्ष, उपसभापती त्यांच्या जबाबदारीचा अडीच वर्षांचा कालावधी संपल्यानंतरही पूर्वीप्रमाणेच कामकाज सांभाळतील.
ग्रामीण विकास मंत्रालयाचे उपसचिव एकनाथ गागरे यांनी सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना 16 जुलै रोजी होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलण्याचे आदेश देणारे परिपत्रक जारी केले आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायद्यातील संबंधित नियमांमध्ये सुधारणा करण्याचा सरकार विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
त्यामुळे पदाधिकार्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपत असताना तूर्तास निवडणूक पुढे ढकलून पुढील आदेश येईपर्यंत विद्यमान पदाधिकारीच पूर्वीप्रमाणेच कामकाज सांभाळतील. नागपूर जि.प.मधील अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ १७ जुलै रोजी संपत आहे. आता पुढील आदेश येईपर्यंत ते या पदावर कार्यरत राहणार आहेत.


