मराठी शाळा वाचवण्याची गरज – डॉ. पंकज चांदे
नागपूर : मराठी भाषा वाचवण्यासाठी खूप प्रयत्न सुरू आहेत. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात, तांत्रिक शिक्षणात मराठी सक्तीची केली जात आहे. पण हे प्रयत्न अपुरे आहेत. मराठी शाळा वेगाने बंद पडत असून मराठीबाबत गंभीर विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. मराठी शाळांची दुरावस्था थांबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने शासन स्तरावर प्रयत्न करावे, असे मत संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांनी व्यक्त केले.
साहित्य विहार, नागपूर आयोजित राज्यस्तरीय सृजन साहित्य संमेलनातील दुपारच्या सत्रात उल्लेखनीय पुरस्कार प्राप्त साहित्यिक शुभांगी भडभडे, डॉ. भारती सुदामे, डॉ. संजय बर्वे,सौ.स्वाती सुरंगळीकर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला संमेलनाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष प्रख्यात साहित्यिक डा.सदानंद मोरे यांच्यासह साहित्य विहार संस्थाध्यक्ष आशा पांडे यांच्यासह सत्कारमूर्ती मंचावर उपस्थिती होती. शुभांगी भडभडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सत्रसंदर्भ प्रीती वडनेरकर यांनी सांगितले तर सूत्रसंचालन मृणालिनी वाघमारे यांनी केले. आभार वर्षा पतकी थोटे यांनी मानले.
‘सुजन संवाद’ कार्यक्रमांतर्गत जगप्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर यांची मुलाखत कवयित्री सना पंडित यांनी तर विदर्भ साहित्य संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदीप दाते यांची मुलाखत प्रा. विवेक अलोणी यांनी घेतली. प्रदीप दाते यांनी स्व. मनोहर म्हैसाळकर यांच्या निधनानंतर विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्षपद स्वीकारणे जबाबदारीचे काम आहे. वर्धेचे साहित्य संमेलनही आता त्याच जबाबदारीने पार पाडावी लागणार असून ते यशस्वी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे सांगितले. विष्णू मनोहर यांनी पाककलेपासून ते 55 पुस्तके लिहिण्यापर्यंतचा प्रवास उलगडला. महाराष्ट्राचा खाद्यसंस्कृती कोश लिहिताना गावागावात जाण्याचा योग आला, असे त्यांनी सांगितले.
या सत्राचे संदर्भ डॉ. माधुरी वाघ यांनी विशद केले. शेवटच्या सत्रात ज्येष्ठ लेखक व विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेत प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. नवोदित लेखकांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धांमधील विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात आले. यावेळी मंचावर साहित्य विहार संस्थेच्या अध्यक्ष आशा पांडे, सचिव अर्चना अलोणी, डॉ. श्रीकांत गोडबोले यांची उपस्थिती होती. सत्रसंदर्भ डॉ. अर्चना अलोणी यांनी विशद केले तर माला पारधी, चित्रा कहाते व वर्षा थोटे यांनी सूत्रसंचालन केले.


