ग्रामायण प्रदर्शनीच्या चौथ्या दिवशी स्वीकार संस्थेतर्फे सांस्कृतिक मेजवानी
नागपूर : ग्रामायण प्रतिष्ठान, नागपूर महानगरपालिका व पश्चिम नागपूर नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रामनगर मैदानात सुरू असलेल्या ग्रामायण सेवा प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी स्वीकार या मानसिकदृष्ट्या विकलांग मुलांच्या पालकांच्या संस्थेच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
ऑटीस्टिक, डाऊन सिंड्रोम, सेलेब्रल पाल्सी सारख्या मानसिक विकारांनी ग्रस्त दहा मुलांनी यावेळी नृत्य, गायन, वादन सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. स्वीकार संस्थेचे उपाध्यक्ष विकास खळतकर यांच्या मार्गदर्शनात 18 वर्षांवरील या मुलांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.

दुपारच्या सत्रात सोशल वर्क स्टुडंट इंटरफेस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात विदर्भातील समाजकार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना तज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सुरुवातीला सामाजिक उपक्रमांच्या सर्व स्टॉल्सना भेट दिली व त्यानंतर या क्षेत्रातील तज्ञांशी संवाद साधला. नागपूरच्या तिरपुडे कॉलेज ऑफ सोशल वर्कच्या डॉ. शिल्पा पुराणिक यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
अभ्युदय ग्लोबल व्हिलेज स्कूलची संकल्पना सुरू करणारे विकल्प संस्थेचे डॉ. प्रकाश गांधी हे प्रमुख वक्ते होते. डॉ. शिल्पा पुराणिक यांनी आभार प्रदर्शन केले. डॉ. विजय घुगे यांनी विद्यार्थ्यांना आदिवासींसोबत काम आणि पर्यावरण या विषयावर मार्गदर्शन केले. वन हक्क कायदा, संयुक्त किंवा व्यवस्थापन, वन धन योजना आणि आदिवासींशी संबंधित इतर मुद्द्यांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले.


