Home क्राइम लघुवेतन कॉलनी येथे माकडांची दहशत, एक इसम थोडक्यात बचावला !

लघुवेतन कॉलनी येथे माकडांची दहशत, एक इसम थोडक्यात बचावला !

0

नागपूर :  शहराच्या उत्तर नागपूर येथील इंदोरा लगत असलेल्या लघुवेतन कॉलनी परिसरात माकडांच्या कळपाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. शेजारच्या मातोश्री रमाई आंबेडकर उद्यानाच्या परिसरात तर नागरिकांनी माकडांच्या भितीने’मॉर्निंग वॉक’ला येणे बंद केले आहे. एका महिलेला माकडाने जखमी केले. मंगळवारला तर एक इसम माकडाचा शिकार होताना थोडक्यात बचावला.

लघुवेतन कॉलनी १९९ घरांची एक सुशोभीत वसाहत आहे. या वसाहतीला लागूनच चॉक्स कॉलनी, मॉडल टाऊन, मायानगर, विद्यानगर, ठवरे कॉलनी, आंबेडकर कॉलनी, पंजाबी लाईन वसाहती आहेत. येथील अनेक नागरिक लघुवेतन कॉलनीच्या मातोश्री रमाई आंबेडकर उद्यानात ‘मॉर्निंग वॉक’ला येतात. सकाळच्या वेळेला उद्यान परिसर नागरिकांनी चांगलाच फुललेला असतो. मात्र काही दिवसांपासून लघुवेतन कॉलनी परिसरात माकडांच्या कळपाने धुमाकूळ घातल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरणात आहे.

घरांच्या छताला तर माकडांनी आपले निवासस्थान बनविले आहे. मंगळवार (२ मे) ला तर माकडांच्या कळपाने लघुवेतन कॉलनीच्या मातोश्री रमाई आंबेडकर उद्यान परिसरात सकाळी दोन तास चांगलाच धुमाकूळ घातला. उद्यान परिसरात आलेल्या नागरिकांना माकडांनी चांगलेच पळविले. अनेकांनी तर ‘मॉर्निंग वॉक’करने बंद केले.

गार्डनमध्ये काम करायला आलेल्या  महिलांमध्ये हि माकडांनी दहशत निर्माण केली आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी उद्यान परिसरातील योगा शेड मध्ये योगासन करीत असलेल्या एका वयोवृद्ध महिलेला माकडाने मागून धक्का दिला. त्यामुळे त्या महिलेला गंभीर दुखापत झाली.

मंगळवार (२ मे) रोजी हि सकाळी माकड एका इसमाच्या मागे धावला. थोडक्यात तो इसम बचावला. अनेकांना माकडांच्या कळपाने मंगळवारी दिवसभर त्रास दिला. वनविभागाच्या संबंधित विभागाने घटनेची गंभीर दखल घेण्याची मागणी लघुवेतन कॉलनीच्या नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here