पंतप्रधान मोदी इतिहासाचे विकृतीकरण करीत आहेत, याचे हे उदाहरण आहे – डॉ. नितीन राऊत
‘इंडिया’ एवजी ‘भारत’ असा उल्लेख असल्याने बोचरी टीका
नागपूर – जनतेत ‘इंडिया’ ला मिळत असलेला प्रतिसाद पाहून सत्याधाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे नाव काढण्याच्या प्रयत्न केला जात आहे. मात्र ‘इंडिया’ हे नाव हटविण्याच्या कोणालाही अधिकार नाही. पंतप्रधान मोदी इतिहासाचे कसे विकृतीकरण करीत आहेत, याचे हे उदाहरण आहे. आम्ही सारे पक्ष एकत्र आलो म्हणून फॅसिस्ट भाजपला देशाचेच नाव बदलावे वाटू लागले. भाजपला ‘इंडिया’ या एकाच शब्दाची भीती वाटत आहे, अशी बोचरी टीका काँग्रेसचे जेष्ठ नेते व राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज निघालेल्या लोकसंवाद पदयात्रे दरम्यान केली.
सकाळी 8 वाजता हर्षवर्धन बुद्ध विहार नझूल ले-आऊट येथून लोकसंवाद पदयात्रा सुरु झाली. दिलीप नगर, जरीपटका रोड, अंगुलिमाल बुद्ध विहार, लूंबिनी बुद्ध विहार, सिद्धार्थ समाजभवन, गौतम नगर, पंजाबी लाईन, कडबी चौक येथून पदक्रमण करित बेझनबाग बुद्ध विहार येथे पहिल्या टप्पातील पदयात्रा समाप्त झाली. तसेच पदयात्रेच्या दुसऱ्या टप्पाची सुरुवात सायंकाळी चार वाजता बेझनबाग येथील गुरुनानक शाळा ग्राउंड येथून झाली.
ही यात्रा रमाबाई चौक, सुदर्शन कॉलनी, भंडार मोहल्ला, मोठा बुद्ध विहार, शहीद स्मारक परिसर, आनंद रोड, रात्री निवारा, नागार्जुन गेट त्रिकोणी मैदान, सारी पुत्र बुद्ध विहार परिसर, लघुवेतन कॉलनी येथून पदक्रमण करीत ही यात्रा इंदोरा चौक येथे थांबली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ‘इंडिया’चा किती धसका घेतला आहे हेच यावरून कडून येते. राष्ट्रपतींनी धाडलेल्या निमंत्रण पत्रिकेतील उल्लेख पाहता ‘इंडिया’ हा शब्द देशाच्या नावासाठी वापरूच नये या दृष्टीने केंद्राची वाटचाल असल्याचे दिसून येते. असेही यावेळी डॉ. राऊत म्हणालेत. पदयात्रेत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.
पदयात्रेत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे महासचिव संजय दुबे, नागपूर शहर कॉंग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष श्री बंडोपंत टेंभुर्णे, ठाकूर जग्यासी, हरिभाऊ किरपाने, महिला कॉंग्रेस, एन एस यु आय, युवक कॉंग्रेस, कॉंग्रेस सेवादल तसेच सर्व फ्रंटल संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता सह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.


