स्वच्छ भारत अभियान: उपद्रव शोध पथकाद्वारे १५ ठिकाणी कारवाई
नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरूवारी (ता.२) १५ प्रतिष्ठानांवर कारवाई करून एकूण १ लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख श्री. वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात मनपाच्या उपद्रव शोध पथकाच्या दहाही झोनमधील जवानांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे.
मनपाच्या लक्ष्मीनगर झोन मधील रहाटे कॉलनी येथे आंबुलकर हॉस्पीटल आणि पांडे लेआउट येथे महालक्ष्मी इन्फ्रास प्रा.लि. द्वारे रस्त्यालगत बांधकाम साहित्य ठेवल्याप्रकरणी अनुक्रमे १० हजार व ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. याचप्रकारे धरमपेठ झोनमध्ये आकार नगर येथे डेस्टनी बिल्डर्स, आकार नगरातील रॉयल हाईट्स, राजा राणी चौकातील चंचल सिंग रेणू यांच्याद्वारे देखील रस्त्यालगत बांधकाम साहित्य ठेवण्यात आल्याने प्रत्येकी १० रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. रामदासपेठ येथील तुली इंम्पिरियल येथे रंगोली प्रदर्शनीचे होर्डिंग अनधिकृतरित्या विद्युत खांबांवर लावण्याप्रकरणी १० हजार रुपये आणि राम नगर हिलटॉप येथील ग्रीन हॉस्पीटॅलिटी रेस्टॉरेंटचा कचरा रस्त्याच्या बाजूला टाकल्याप्रकरणी ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.
हनुमान नगर झोन पथकाद्वारे मेडिकल चौकातील टाकखेडे बिल्डर्सवर आणि धंतोली झोन पथकाद्वारे मनीष नगर येथील कनिका रेसिडेन्सीवर रस्त्यालगत बांधकाम साहित्य ठेवल्याप्रकरणी प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. नेहरूनगर झोन पथकाद्वारे नंदनवन येथील योगेश क्षीरसागर यांचेवर प्लास्टिक आणि इतर कचरा रस्त्यालगत जाळल्याप्रकरणी ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. गांधीबाग झोन पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक बाळगल्याप्रकरणी सीए रोडवरील परमात्मा किराणा स्टोर्स आणि इतवारी येथील पारसचंद्र ट्रेडर्स यांच्यावर कारवाई करीत प्रत्येकी २ किलो प्लास्टिक जप्त करून प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली.
लकडगंज झोन पथकाद्वारे रस्त्यालगत बांधकाम साहित्य ठेवल्याप्रकरणी भारत नगर येथील आदित्य बिल्डर्सवर १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. आशीनगर झोन पथकाद्वारे लष्करीबाग येथील शिवालीक कन्स्ट्रक्शनच्या पोकलेनद्वारे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती पसरविण्यात आल्याचे प्रकरणी १० हजार रुपये आणि रस्त्यालगत कचरा टाकल्याप्रकरणी आदित्य द्विवेदी यांचेवर ५ हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. शहरातील उपरोक्त ठिकाणी करण्यात आलेल्या १५ ठिकाणच्या कारवाईमधून १ लाख २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.


