भाजपचे प्रदेशाध्यक्ष जुगार खेळतात : संजय राऊत
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मागील काही दिवसांपासून भाजपवर सातत्याने टिका करतांना दिसत आहेत. यातच आता संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या ट्विटमध्ये भाजपचा बडा नेता जुगार खेळत असल्याचा दावा केला आहे. तर भाजपच्या नेत्यांनी आदित्य ठाकरे यांचे ट्विट करीत आदित्य ठाकरेंच्या ग्लासमध्ये कुठल्या ब्रांडची ‘व्हिसकी’ असा सवाल केला आहे. त्यामुळे, आता महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोपचा खेळ सुरु झालेला आहे.
संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की, महाराष्ट्र पेटलेला आहे आणि हे महाशय मकाऊ येथे कासिनोत जुगार खेळत आहेत. यापुढे फोटो झूम करून पाहण्यासाठी देखील राऊतांनी म्हटलंय.
दुसऱ्या ट्विटमध्ये राऊतांनी असं लिहिलंय की, १९ नोव्हेंबर मध्यरात्री मुक्काम पोस्ट मकाऊ, साधारण ३.५० कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदुत्वावादी असल्याने महाशय द्युत खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना? असा खोचक गंभीर आरोप राऊतांनी केलाय.


