लघुवेतन कॉलनी मध्ये कारच्या काचा फोडल्या
उत्तर नागपुर लघुवेतन कॉलनी भागात टवाळखोरांनी तीन चारचाकी वाहनांच्या काचा फोडून नुकसान केल्याचे सोमवार (२५ डिसेंबर) रोजी सकाळी उघडकीस आले आहे. दारूच्या नशेत समाजकंटकांकडून वाहनांच्या काचा फोडण्याचे कृत्य केले जात असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
टवाळखोरांकडून गेल्या महिन्यात लघुवेतन कॉलनी भागातील विजय गजभिये यांच्या कारची काच फोडली होती. तसेच, शेंडे यांच्या घरांची काच टवाळखोरांनी फोडली होती. आता त्यानंतर पुन्हा वाहनांच्या काचा फोडण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलिस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी भेट देत पहाणी करुन पंचनामा केला आहे.
कोणालाही अडथळा न ठरणाऱ्या आणि घराच्या समोर उभ्या करण्यात आलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्याचे कारण काय? असा प्रश्न आता लघुवेतन कॉलनी येथील रहिवाशांना भेडसावित आहे. असे कुकृत्य करणाऱ्या टवाळखोरांवर पोलिसांनी वचक बसवावा, अशी मागणी लघुवेतन कॉलनी येथील पीडित मिलींद भोयर, भुषण रामटेके, मुन्ना सवाईथूल आदींनी केली आहे. काचा फोडलेली वाहने लघुवेतन कॉलनीच्या वेगवेगळ्या भागातील आहेत. हातात मिळेल तो दगड वाहनांच्या काचांवर फेकत नुकसान करण्यात आले आहे.
दोषींवर कारवाईची मागणी
लघुवेतन कॉलनी भागात टवाळखोरांनी चारचाकी वाहनांच्या काचा फोडत नुकसान केले. या प्रकरणी दोषींवर तत्काळ कारवाई करण्यात यावी आणि कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यात यावा, अशी मागणी लघुवेतन कॉलनीचे अध्यक्ष महेंद्र राऊत, सचिव म्हात्रे व संचालक मंडळाने केली आहे. यासंदर्भात पोलीसांना निवेदन देण्यात आले आहे. जरीपटकाचे पोलीस निरीक्षक बाकल यांनी दोषी टवाळखोरांवर कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले.