शेतकरी समृद्ध होण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी : कृषी क्षेत्रातील संघटनांतर्फे स्नेहमिलन
नागपूर – विदर्भातील शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी आपल्याला सामूहिक प्रयत्न करावे लागतील. निरनिराळ्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्या लागतील. नावीन्यपूर्ण कल्पना अमलात आणाव्या लागतील. शेतकरी समृद्ध झाला तर गावांची अर्थव्यव्यवस्था वाढीस लागेल आणि स्मार्ट व्हिलेज संकल्पना प्रत्यक्षात साकारली जाईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (बुधवार) व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सतत काम करत राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
अॅग्रोव्हिजन फाउंडेशन आणि अॅग्रोवेट मित्र परिवार यांच्या वतीने लक्ष्मीनगर येथील राणी लक्ष्मी लॉनवर स्नेहमिलन आयोजित करण्यात आले. कृषी क्षेत्राशी संबंधित विविध संस्थांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ डॉ. सी.डी. मायी, रवी बोरटकर, रमेश मानकर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
कृषी क्षेत्राचा प्रचंड विकास व्हावा, अशी सर्वांची इच्छा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण अॅग्रोव्हिजन प्रदर्शन आयोजित करतोय. त्यात लाखो शेतकरी सहभागी होतात, याचा आनंद आहे, अशा भावना ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केल्या. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘कृषी विकासाचा दर वाढला तर कृषी सेवा केंद्रांची उलाढाल वाढणार आहे.
शेतकऱ्यांची खरेदीची क्षमता वाढली तरच ते शक्य होईल. त्यामुळे येणाऱ्या काळात उत्पादन खर्च कमी करून अधिक उत्पन्नावर भर देणे गरजेचे आहे. कृषी क्षेत्रातील उणिवा कोणत्या आहेत आणि त्या कशा सोडवता येतील, याचा विचार करावा लागेल. आज आपल्या देशात जगातील अनेक फळपिके भारतात घेण्यात येतात. चांगल्या दर्जाची फळे सर्वत्र मिळत नाहीत.
त्यामुळे बियाणे आणि नर्सरीच्या क्षेत्रात खूप काम करणे गरजेचे आहे.’ ‘डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या नावाने जागतिक दर्जाचे अॅग्रो कन्व्हेन्शन सेंटर अमरावती रोडवर उभारण्यात येणार आहे. लवकरच या कामाला सुरुवात होईल. त्याच ठिकाणी २ हजार आसन क्षमतेचे स्व. वसंतराव नाईक यांच्या नावाचे सभागृह देखील होणार आहे,’ अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. विदर्भातील संत्रा, कापूस निर्यात व्हावा, यासाठी प्रयत्न केला जात आहे. सिंदी ड्राय पोर्टमुळे हा उद्देश पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.