नागपूर शहरातील वाहतूक सुधारणांसोबतच
पार्कीगचा प्रश्न प्राधान्याने सोडवा – विजयलक्ष्मी बिदरी
शहर वाहतूक व्यवस्थेचा आढावा
सिग्नल व्यवस्था आधुनिकीकरणासाठी 197.63 कोटी
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा
समन्वयातून अपघातमुक्त शहरासाठी आराखडा
नागपूर : नागपूर शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासोबतच सिग्नल व्यवस्था एकाचवेळी कार्यान्वीत होण्यासाठी (सिंक्रोनाईस) १९७ कोटी ६३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून येत्या जून अखेरपर्यंत वाहतूक सुरळीत करण्याची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नागपूर शहर व सभोवतालच्या परिसरातील वाहतूक व्यवस्था तसेच पार्कीगचा प्रश्न सोडविण्यासाठी श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी सूचना केल्या. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिणा, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, महसूल उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशीकांत सातव, नगररचना विभागाचे सहसंचालक श्रीमती सु.प्र.थुल, उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार आदी उपस्थित होते.
नागपूर शहर व सभोवतालच्या परिसरात वाहतुकीसंदर्भात उपाययोजना सुचविण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल करुन नागरिकांना उत्तम वाहतूक सुविधा निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात आले असून त्याअंतर्गत रस्ते सुरक्षेसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
याअंतर्गत ट्रॉफिक सिग्नलच्या सिंक्रोनायझेशनचा १९७ कोटी ६३ लक्ष रुपयाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून येत्या जून पासून कामाला सुरुवात होत आहे. शहरातील वाहतूक शाखेचे आधुनिकीकरण व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यावश्यक अत्याधुनिक साधने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यामध्ये दहा टोइंग व्हॅन, पाच अतिरिक्त इंटरसेफ्टर वाहनांचा समावेश आहे.
२३ अपघात प्रवण स्थळांची विशेष दुरुस्ती नागपूर शहर व परिसरात २३ अपघात प्रवण स्थळ निश्चित करण्यात आले असून भविष्यात अपघात होणार नाही यादृष्टिने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. महानगरपालिकेतर्फे १५ अपघात प्रवण स्थळांवर गतीरोधक, झेब्रा क्रॉसिंग, सूचना फलक, सिग्नल व्यवस्था, अतिक्रमण निर्मुलन तसेच डिव्हायडर दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत.
अपघात प्रवण स्थळांवर होणारे अपघात टाळण्यासाठी या ठिकाणांवर यापूर्वी झालेले अपघात, जीवीत हानी तसेच अपघात टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना बाबतचे सचित्र माहितीफलक तात्काळ लावण्याचे निर्देश श्रीमती बिदरी यांनी यावेळी दिले. रस्त्यावर पार्कीगमुळे होणारा वाहतूक अडथळा दूर करण्यासाठी शहरात ७५ रस्त्यांची निवडकरुन ऑन स्ट्रीट पार्कीगची सुविधा निर्माण करण्यात येत आहे. त्यापैकी पोलीस विभागाच्या समन्वयाने १५ रस्त्यांवर पार्कीग सुविधा येत्या १५ दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी सूचना फलक व पार्कींगची जागा निश्चित करण्याची कार्यवाही सुरु आहे.
शहरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पार्कींगसाठी विविध भागात जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यासोबतच बळकस चौक, नेताजी मार्केट, महात्मा फुले भाजी बाजार आदी ठिकाणी पार्कींगची सुविधा तसेच वाहन तळासाठी राखीव असलेल्या जागेचा शोध घेण्याची सूचना यावेळी करण्यात आल्या. पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीला प्राधान्य पावसाळ्यामध्ये रस्त्यावर पाणी साचणार नाही यादृष्टिने नागपूर महानगरपालिकेतर्फे खड्डे भरण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात आले आहे. डिसेंबर २०२३ अखेर पर्यंत ४२ हजार ६८ चौ.मिटर क्षेत्रावरील ६३४ खड्डे भरण्यात आली आहेत.
यासोबतच रस्त्यांवरील झाडांच्या आवश्यकतेपेक्षा वाढलेल्या फांद्यांची कापणी करणे, विद्युत वाहिन्यांना अडथळा निर्माण होणार नाही यादृष्टिने उपाययोजना करण्यात याव्यात. यादिशेने तात्काळ कार्यवाही सुरु करण्यात आली असून यासाठी कंत्राटदाराची नियुक्त करण्यात आल्याची माहिती प्रभारी आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी दिली. महसूल विभागाचे उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या विविध उपायोजनांची यावेळी माहिती दिली.