नागपूरः तीन वर्षीय बालकावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. यात बालकाचा मृत्यू झाला आहे. वंश असे मृतक बालकाचे नाव आहे. नागपुर जिल्ह्यातील मौदा तालूका अंतर्गत येणाऱ्या गणेश नगर परिसरातील हि घटना आहे.
सुत्राने दिलेल्या माहिती नुसार वंश हा घराच्या गेटजवळ खेळत होता. आई घरातील कामात व्यस्त होती तर वडील कामावर गेले होते. गेट जवळच दोन ते तीन मोकाट कुत्रे बसले होते. वंश घराबाहेर पडताच या मोकाट कुत्र्यांनी वंश वर हल्ला केला. शेजाऱ्यांनी कुत्र्यांच्या तावडीतून वंशला कसे बसे सोडविले. मात्र मोकाट कुत्र्यांनी वंशला चांगलेच गंभीर जखमी केले होते.
शेजाऱ्यांनी लगेच वंशला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र उपचारा दरम्यानच चिमुकल्या वंशची प्राणज्योत मालवली. मानेची नस चिरडल्या गेल्याने वंशचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नागपुर शहरात अनेक वसाहतींमध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर आहे. वाहनांच्या मागे हे मोकाट कुत्रे धावतात. अनेकदा अपघातही झाले आहेत. आता पावसाळा लागणार आहे. मनपाने वसाहती मध्ये फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांची योग्य जागी व्यवस्था करावी, अशी मागणी आता या घटनेमुळे होत आहे.