नागपूरातील मेट्रो प्रवाशांसाठी आता व्हॉट्सअॅपवर आधारित तिकिट प्रणाली उपलब्ध
नागपूर : नागपूरमधील प्रवाशांसाठी प्रवास आणखी सोपा करण्यासाठी व्हॉट्सअॅपने एक व्हॉट्सअॅप आधारित क्यूआर तिकिटिंग सेवा सुरू केली. शहरभरातील मेट्रो प्रवासी या सेवेचा लाभ घेऊ शकतील.
या तिकिट प्रणालीमध्ये प्रवाशांना कोठूनही अखंडितपणे मेट्रो तिकिटे बुक करता येतील तसेच खरेदी करता येईल. ही सर्व प्रक्रिया व्हॉट्सअॅप चॅटबोटमार्फत पूर्ण होईल. ही सेवा इंग्रजी, हिंदी, मराठी व तेलुगू अशा चार भाषांमध्ये उपलब्ध आहे. +91 8624888568 या क्रमांकावर ‘Hi’ असा मेसेज पाठवून किंवा क्यूआर कोड स्कॅन करून ग्राहक या सेवेचा लाभ घेऊ शकतात.
नागपूर मेट्रोच्या सर्व मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिटे बुक करण्याची, ताजी माहिती प्राप्त करण्याची तसेच केवळ काही क्लिक्ससरशी प्रवासाची अत्यावश्यक माहिती मिळवण्याची मुभा चॅटबोट देते. एकाच मार्गावरून वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चॅटबोट झटपट खरेदी सेवाही देऊ करत आहे. त्यामुळे चॅटबोटमध्ये गंतव्य स्थान व सुरुवातीचे स्थानक निवडण्यात जाणारा वेळही वाचू शकेल.
व्हॉट्सअॅपवर आधारित तिकिट प्रणालीच्या माध्यमातून प्रवासी एका व्यवहारामार्फत जास्तीत-जास्त सहा एकेरी प्रवास तिकिटे किंवा जास्तीत-जास्त ४० प्रवाशांसाठी सामूहिक तिकिटे बुक करू शकतो. पेमेंटसाठी प्रवासी चॅट विंडोमधील त्यांच्या पसंतीचा पर्याय (यूपीआय, डेबिट-क्रेडिट कार्ड आदी) निवडू शकतात. मेटा इन इंडियाच्या बिझनेस मेसेजिंग विभागाचे संचालक रवि गर्ग म्हणाले, “नागपूर मेट्रोमध्ये व्हॉट्सअॅपमार्फत क्यूआर तिकिट सेवा आणल्यामुळे ग्राहकांना अधिक चांगला अनुभव मिळेल.
नागपूर शहरातील लक्षावधी मेट्रो प्रवाशांना यामुळे अधिक आधुनिक व बुद्धीवर आधारित साधनांद्वारे सेवा मिळू शकेल. या सहयोगाच्या माध्यमातून आम्ही देशभरातील प्रवास अनुभव सुलभ करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. यामुळे प्रवाशांना त्यांच्या व्हॉट्सअॅप चॅटच्या माध्यमातून योग्य पद्धतीने कामे करणे शक्य होईल.”
गेल्या काही महिन्यांत अनेक राज्य परिवहन सेवांनी व्हॉट्सअॅपसोबत एकात्मीकरण केले आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक सुलभ व सोयीस्कर अनुभव मिळत आहे. या एकात्मीकरणामुळे अशा पद्धतीची सेवा देणारी नागपूर मेट्रो देशातील सहावी मेट्रो सेवा ठरली आहे. बेंगळुरू, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई व पुणे येथील मेट्रोसाठी आधीपासूनच तिकिटांचे बुकिंग व खरेदी व्हॉट्सअॅप चॅटद्वारे होत आहे.


