आम्ही आंदोलन करणारे आहोत, गुन्हेगार नाहीत – डॉ. नितीन राऊत
दीक्षाभूमी येथे झालेल्या आंदोलनातील गुन्हे सरकारने मागे घ्यावेत सभागृहात मागणी
नागपूर : दीक्षाभूमी परिसरात भूमिगत पार्किंगला विरोध म्हणून झालेल्या आंदोलनात आंदोलन करणाऱ्या भीमसैनिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहे. आम्ही आंदोलन करणारे आहोत गुन्हेगार नाहीत. आंदोलकांवरील गुन्हे सरकारने मागे घ्यावेत, अशी मागणी आज सभागृहात महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी केली.
दीक्षाभूमी येथे पार्किंगसाठी खोदलेल्या खड्ड्यामुळे स्तूपाला धोका होईल, बोधिवृक्ष अडचणीत येईल त्यामुळे दीक्षाभूमी येथे भीमसैनिकांनी स्वयंस्फूर्तीने आंदोलन केले होते. आंदोलन करणाऱ्या शेकडो ज्ञात-अज्ञात आंदोलकांवर बजाजनगर पोलिसांनी दोन गंभीर प्रकाराचे गुन्हे दाखल केले आहे. ज्यावेळी भूमिगत पार्किंग विरोधात नागरिकांमधला रोष समाज माध्यमातून व्यक्त होत होता त्यावेळी पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन काय करीत होते? असा प्रश्न ही डॉ. राऊत यांनी सभागृहात उपस्थित केला.
भीमसैनिक आणि समाजबंधूनी दीक्षाभूमी येथील भूमिगत पार्किंगला बऱ्याचदा विरोध दर्शवला आहे. मात्र, राज्य सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. विकासाच्या योजनेबाबत समाजाशी चर्चा का केली नाही असा जाब विचारून दीक्षाभूमी परिसरात आंदोलन झाले, यासाठी पोलीस प्रशासन, जिल्हाप्रशासन आणि सोबतच राज्य सरकारही जबाबदार असल्याचा आरोप यावेळी डॉ. राऊत यांनी केला.