दिवंगत ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांच्या जीवनावरील ‘अग्निशिखा‘ ऑडिओ बुक युवा पिढीसाठी मार्गदर्शक-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : दिवंगत ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज अभ्यासू, व्यासंगी आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्व होत्या. लोकसभा विरोधी पक्ष नेते, परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून त्यांनी खूप मोठे योगदान दिले आहे. ‘अग्निशिखा : सुषमा स्वराज‘ या ई आणि ऑडिओ बुकच्या माध्यमातून त्यांचे कार्य, जीवन प्रवास निश्चितच युवा पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मेघदूत निवासस्थानी व्यक्त केला.
अग्निशिखा ऑडिओ व ई-बुकचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, दिवंगत ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री असताना पासपोर्ट आणि व्हिसाबाबत अनेक सुधारणा केल्या. यामध्ये अनेक देशांशी केलेले करार, पासपोर्ट सुविधा सुलभ करण्याचा निर्णय महत्वाचा आहे. त्यांच्या या निर्णयांमुळे आपल्याला इतर देशांचा व्हिसा आणि पासपोर्ट मिळणे सोपे झाले आहे. लोकसभेत विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी तत्कालीन सरकारच्या कारभारावर केलेले अभ्यासपूर्ण विवेचन त्याकाळी खूप गाजले. त्यांचा व्यासंग, विषयाची हाताळणी, प्रचंड बुद्धिमत्तेसोबत असलेली स्मरणशक्ती ही त्यांच्या व्यक्तीमत्वाची विशेष ओळख होती.
दिवंगत ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचा विविध भाषांचा अभ्यास होता. भाषेचे सौंदर्य ओळखण्याची विशेष कला त्यांना अवगत होती. त्या बोलताना कधीही समोर कागद ठेवत नव्हत्या. हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे आजही मार्गदर्शक ठरत आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सुषमा स्वराज यांच्या कार्याचा गौरव केला.
मेधा किरीट लिखित पुस्तकाचे ऑडिओ बुक व ई-बुक प्रकाशन मराठीसह हिंदी व इंग्रजी या तीन भाषांमध्ये करण्यात आले आहे. डिजिटल माध्यमातून पुस्तकाची निर्मिती झंकार स्टुडिओ, पुणे येथे झाली आहे. या कार्यक्रमाला माजी खासदार किरीट सोमय्या, मराठी अभिवाचक तनुजा राहणे, ई–बुक पुस्तक रचनाकार स्वाती जोशी, हिंदी अभिवाचक दिव्या शारदा, ‘झंकार’चे संचालक सत्यजित पंगू आणि आनंद लिमये उपस्थित होते.