श्री साई मंदिर नागपूर येथे श्री साई बाबांच्या मूळ ‘चर्म चरण पादुकां’चा दर्शन सोहळा 26-27 एप्रिल रोजी आयोजित
श्री साई बाबा सेवा मंडळ व श्री साई बाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सोहळ्याचे आयोजन
सांस्कृतिक व संगीतमय कार्यक्रमांची रेलचेल
नागपूर, 24 एप्रिल- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डी व श्री साईबाबा सेवा मंडळद्वारा संचालित श्री साई मंदिर, वर्धा रोड नागपूर यांच्या सहयोगाने श्री साईबाबांनी वापरलेल्या ‘मूळ चर्म चरण पादुकां’चा दर्शन सोहळा शनिवार 26 व रविवार 27 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. विदर्भाची प्रतिशिर्डी असलेल्या नागपूर येथील वर्धारोड स्थित साई मंदिरात 1976 साली मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यादरम्यान प्रथमच आणि दुसऱ्यांदा 1979 साली श्रीदत्तजयंतीच्या पर्वावर या दिव्य चर्म चरण पादुकांचे आगमन झाले होते.
तिसऱ्यांदा श्री साईबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त 2018 साली पादुकांचा दर्शन सोहळा पार पडला. आता चौथ्यांदा या दिव्य पादुकांचे आगमन साई मंदिर संस्थानात होणार आहे. 26 व 27 एप्रिल 2025 या दोन दिवशी या पादुकांचा भव्य दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 26 एप्रिल रोजी दुपारी 12 च्या आरतीनंतर ते रात्री मंदिर बंद होईपर्यंत या पादुका भक्तांच्या दर्शनास ठेवण्यात येतील तर, 27 एप्रिलला पहाटे 5.30 ते रात्री मंदिर बंद होईपर्यंत भक्तांना या पादुकांच्या दुर्लभ दर्शनाचा लाभ मिळणार आहे. 26 एप्रिल शनिवार रोजी सकाळी 9.30 वाजता साईबाबांच्या या दिव्य चर्म पादुकांचे नागपूर विमानतळावर आगमन होणार असून 10 वाजता सुरु होणाऱ्या भव्य पालखी मिरवणूकीच्या गाजावाजात पादुका साईमंदिरात आणण्यात येतील.
पादुकांचे पाद्यपूजन व 12 वाजताची आरती झाल्यानंतर पादुका सर्वांकरिता दर्शनास ठेवण्यात येतील. पादुकांच्या आगमनाची मुहूर्तवेढ श्री साई मंदिर धंतोली व श्री साईबाबा सेवा मंडळाचे (वर्धा रोड) संस्थापक अध्यक्ष प.पू. श्री विजयबाबा कोन्ड्रा यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाने रोवण्यात येईल.
या दिव्य चर्म चरण पादुकांच्या दर्शन सोहळ्याचे औचित्य साधत दोन दिवस सांस्कृतिक व संगीत कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. शनिवार 26 एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात सकाळी 9.30 वाजता महालक्ष्मी इव्हेंट ऑर्गनायझर, दुपारी 12 वाजता भस्मे ताई यांचे नवशक्ती महिला भजन मंडळ, 4.30 वाजता स्वररमणी श्रीमती विद्या बोरकर व सायंकाळी 7 वाजता राकेश भामरी प्रस्तुत साईराम स्वरसाधना ग्रुप यांचे संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. 27 एप्रिल रविवार रोजी सकाळी 9 वाजता हनुमान भजनी मंडळ अडयाळी, दुपारी 12.30 वाजता हर्षल जोंधळे प्रस्तुत हर्षल म्युजिकल ग्रुप, दुपारी 3 वाजता पुनीत कुशवाह प्रस्तुत जल्लोष बँड व सायंकाळी 7 वाजता महालक्ष्मी इव्हेंट ऑर्गनायझर यांचे संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. दोन्ही दिवशी मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम जसे कि काकड आरती, माध्यान्ह आरती आणि धूप आरती दररोजच्या वेळेनुसारच पार पडणार आहे. श्री साईबाबा सेवा मंडळ, श्री साई बाबा मंदिर(वर्धा रोड) नागपूरचे सचिव श्री अविनाश शेगावकर तसेच अध्यक्ष श्री ओमप्रकाश यादव व कोषाध्यक्ष राजेंद्र देशमुख यांनी सर्व साईबाबा भक्तांना आवाहन केले आहे की त्यांनी या दिव्य चर्म चरण पादुकांचे मोठ्या संख्येने दर्शन घ्यावे व दोन दिवसीय सोहळ्याचा लाभ घ्यावा.
श्री साईबाबा सेवा मंडळ नागपूरचे विश्वस्त डॉ. रवींद्र भोयर,श्री प्रताप रणनवरे,श्री राजेंद्र दांडेकर,श्री घनश्यामदास राठी,श्री कैलाश जोगानी,श्री सुधीर दफ्तरी व श्री महेश टेंभरे यांनी या पादुका दर्शन सोहळ्याच्या भव्य तयारी केली असून श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डीच्या तदर्थ समितीचे विशेष योगदान या आयोजनास लाभले आहे.तदर्थ समितीच्या अध्यक्षा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अहिल्यानगर-श्रीमती अंजु शेंडे (सोनटक्के), सदस्य-अहिल्यानगर जिल्हाधिकारी आयएएस डॉ. पंकज आशिया, सदस्य-अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयएएस श्री गोरक्ष गाडीलकर यांनी या पादुका सोहळ्याच्या आयोजनास विशेष सहकार्य केले.
या दोन दिवसीय सोहळ्यानिमित्त आयोजित महाप्रसादास लागणारे अन्नधान्य जसे कि गहू, तांदूळ, डाळ, तेल, साखर तसेच इतर साहित्य व देणग्या श्री साईबाबा मंदिर(वर्धा रोड) येथील काउंटरवर स्वीकारण्यात येतील अशी माहिती मंदिर प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी आपण मंदिराचा अधिकृत ई-मेल आयडी saibabasewamandal@gmail.com तसेच दूरध्वनी क्रमांक 0712-6606166/9372251665 वर संपर्क साधू शकता. चर्म चरण पादुका सोहळ्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी व मंदिराच्या प्रत्येक कार्यक्रमाबाबत अपडेट मिळविण्यासाठी फेसबुक पेज Sai Mandir, Wardha Road, Nagpur ला फॉलो करा.
श्री साई मंदिर, वर्धा रोड, नागपूर बद्दल :
श्री साईबाबा सेवा मंडळद्वारा संचालित नागपूर येथील वर्धा रोडस्थित श्री साई मंदिर हे विदर्भातील प्रतिशिर्डी म्हणून ओळखले जाते. शिर्डी येथील श्री साई बाबांची मूर्ती ज्या श्री तालीम स्टुडिओ,गोरेगाव(मुंबई) येथे बनली आहे त्याच तालिमीत नागपूर येथील संस्थानात विराजमान असलेली साईबाबांची मूर्ती देखील बनविण्यात आली आहे. संपूर्ण जगातील या दोनच मुर्त्या आहेत ज्या त्यांनी बनवून दिल्या आहेत.
शिर्डी येथील साई मंदिरात ज्याप्रमाणे दररोज विधिपूर्वक पूजा अर्चना केली जाते त्याचप्रमाणे नागपूर येथील मंदिरात देखील पूजा केली जाते. एवढेच नव्हे तर श्री साई बाबा संस्थान विश्वस्त संस्था, शिर्डी यांच्या संकल्पनेनुसार नागपूर येथील श्री साई मंदिराचे भूमिपूजन 16 डिसेंबर 1976 रोजी पार पडले व त्यावेळेस शिर्डी संस्थानाचे रिसिव्हर हे प्रत्यक्ष भूमिपूजनासाठी हजर होते.