संविधान डिबेट्स चे पठण, 8 तासात 15 कलमांवर चर्चा
नागपूर : भारतीय संविधानाच्या हिरक महोत्सवी वर्षा निमित्त 75 तासात संविधान डिबेट्स मधील 75 कलमांवर चर्चेचे पठण करण्याचे कार्य सुरू झाले. आज वाजता सकाळी 9 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्वेंशन सेंटर कामठी रोड नागपूर येथे प्रा देविदास घोडेस्वार यांच्या हस्ते या ऐतिहासिक उपक्रमाचे उद्घाटन झाल्यावर 8 तासात 15 व्यक्तींनी 15 कलमांच्या चर्चेचे पठण केले.
याप्रसंगी आमदार नितीन राऊत, माजी आमदार डॉ मिलिंद माने, विश्वनाथ बांबोडकर, विठ्ठल डांगरे, संदेश थूल, दिनेश अंडरसहारे, उत्तम शेवडे, बंडूपंत टेंभुर्णे यांनी भेटी देऊन उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
प्रा देविदास घोडेस्वार यांनी उद्घाटकीय भाषणात भारत हा कधीच राष्ट्र नव्हता त्याला राष्ट्र बनवण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक प्रयत्न केले, त्यानंतर 26 जानेवारी 1950 ला भारत हा राष्ट्र बनला. भारतीय संविधान हा व्हिजन डॉक्युमेंट आहे, फिलॉसॉफी आहे आणि मानवी उत्थानाचे तत्त्वज्ञान सुद्धा आहे त्यामुळे भारतीय संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी सर्व भारतीयांची असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
या ठिकाणी कांशीराम रिसर्च सेंटरच्या वतीने संविधान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनीत संविधानाच्या इंग्रजी व हिंदीतील मूळ प्रति, तसेच कॉन्स्टिट्यूएन्ट असेंबली डीबेट्स च्या इंग्रजी, हिंदी, मराठीतील प्रती व भारतीय संविधानाच्या विविध प्रकाशकांनी काढलेल्या विविध प्रकारच्या प्रती उपलब्ध आहेत.
या ऐतिहासिक उपक्रमाचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यासाठी सुद्धा टीम आलेली आहे. हा उपक्रम 26 मे च्या सायंकाळी 4 पर्यंत चालणार असून इच्छुक वाचक व श्रोत्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन या कार्यक्रमाचे आयोजक वामन सोमकुवर, उत्तम शेवडे, एड अस्मिता तिडके, सुनील गजभिये, प्रदीप कराडे, गौतम पाटील, चंद्रकांत सोमकुवर, माया उके, वर्षा सहारे, हृदय गोडबोले, रवी गजभिये आदि कार्यकर्त्यांनी केले आहे.