
जातपात, अस्पृश्यता या सामाजिक दुर्गुणांना संपवण्यासाठी कटिबद्ध राहा : नितीन गडकरी
नागपूर : जातपात, अस्पृश्यता या सामाजिक दुर्गुणांना संपवण्यासाठी कटिबद्ध राहा. “जो करेगा जात की बात, उसे देदो लाथ” असा ठाम विचार केंद्रीयरस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मांडला. “शोषित, पीडित, वंचित, दलित, दिव्यांग यांना सक्षम करण्यासाठी केवळ सरकारच नाही, तर प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याने आपले कर्तव्य बजावले पाहिजे,” असे त्यांनी सांगितले. राजर्षी शाहू महाराज जयंती आणि सामाजिक न्याय दिनानिमित्त विवेक विचार मंच, डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित “सामाजिक न्याय परिषद २०२५” कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या परिषदेत संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून सुमारे १२०० नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. सामाजिक न्याय विषयात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील दहा मान्यवरांना “छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार” देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण जीवन समाजाच्या प्रगतीसाठी समर्पित केले. त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन व्यक्ती कर्तृत्वाने मोठी व्हावी, असे समाजात वातावरण निर्माण करण्याची गरज आहे.
गडकरी म्हणाले की, बाबासाहेबांनी शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हटले, त्याचा अर्थ समजून आपल्या मुलाबाळांना शिक्षणाच्या दिशेने वळवायला हवे. त्यांनी सांगितले की, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य जागतिक स्तरावर पोहोचले आणि समाजाने त्यातून शिकले पाहिजे. सेवा, शिक्षण, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात समाजातील प्रत्येकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे.
महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, या परिषदेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांना अपेक्षित समाज आपण घडवूया. विवेक विचार मंचाने समाजातील प्रश्न, समस्या आणि सूचना पटावर घेऊन शासनापर्यंत पोहोचवाव्यात आणि त्यांचे निरसन करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग आणि संपूर्ण महाराष्ट्र सरकार कटिबद्ध राहील असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रसंगी सांगितले की, “आपल्या देशासाठी सर्वोच्च ग्रंथ म्हणजे संविधानच आहे. देशाचे पंतप्रधान २०४७ चा विकसित भारत साकार करण्यासाठी संविधानाला सर्वोच्च स्थान देत कार्यरत आहेत. नागपूरातील दीक्षाभूमी ही सामाजिक समस्यांना दिशा देणारी पवित्र भूमी आहे आणि महाराष्ट्राला सामाजिक न्याय व समतेच्या दृष्टिकोनातून देशात आदर्श निर्माण करण्याचा संकल्प सरकारने केला आहे.
“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हे बाबासाहेबांचे महान विचार लक्षात ठेवून संघटित समाजच सामाजिक न्याय प्रस्थापित करू शकतो,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले. परिषेदेचे अध्यक्षपद जेष्ठ लेखक, विचारवंत पद्मश्री नामदेव कांबळे यांनी भूषविले. परिषदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्थेचे महासंचालक सुनील वारे, नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू सुभाष कोंडावार, स्वागत समितीचे अध्यक्ष भैय्यासाहेब बिघाने, संदीप जाधव, विवेक विचार मंचचे कार्यवाह महेश पोहनेरकर, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धम्मपाल मेश्राम यांचीही प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश धायारकर यांनी केले. आभार प्रदर्शन मंचाचे राज्य संयोजक सागर शिंदे यांनी केले.
जाती निहाय जनगणनेच्या निर्णयाचे स्वागत, महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा कायद्याचे समर्थन व बोधगया महाविहार विषयात सर्व समाजाने सौहार्दपूर्ण भूमिका घ्यावी असे तीन ठराव परिषदेत पारित केले गेले.
सामाजिक न्याय परिषदेच्या यशस्वीतेसाठी सुनील कीटकरू, राजू साळवे, मनीष मेश्राम, आप्पासाहेब पारधे, नितीन केदार, सागर जाधव, दत्ता शिर्के, अनंत जगनीस व अतुल शेंडे यांनी विशेष परिश्रम घेतले,
सामाजिक न्याय परिषद २०२५ – सन्माननीय पुरस्कारार्थी
पश्चिम महाराष्ट्र
श्री.राजेंद्र दामोदर गायकवाड, दिंडोरी, नाशिक.
श्री.चंद्रकांत भानुदास काळोखे, अहिल्यानगर.
मराठवाडा
श्री.आनंद माणिकराव लोखंडे, छत्रपती संभाजीनगर.
श्री. विकास वामन अवसरमल, रावेर, जळगाव.
विदर्भ
श्री. नागेश श्रावण पाटील, वसुधंरा परिवार, नागपूर
श्री. प्रताप फक्कुजी निंदाने, खामगाव, बुलढाणा
श्रीमती. रेखाताई मधुकरराव कांबळे, – अस्मिता मागासवर्गीय बहुउद्देशीय विकास व संशोधन संस्था, अकोला
सेवा सर्वदा बहुद्देशीय संस्था, नागपुर
कोकण
श्रीमती. डाॅ. रेखाताई गोपालसिंह बहनवाल, ठाणे
श्री.ॲड.संदिप दादा जाधव, मुंबई