
खंजरी भजनांच्या स्वरांनी निनादला परिसर
विदर्भस्तरीय भजन स्पर्धेची महाअंतिम फेरी आज
केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते बक्षीस वितरण
विदर्भातील २१ भजन मंडळांची महाअंतिम फेरीसाठी निवड
नागपूर – राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनांवर आधारीत विदर्भस्तरीय स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये खंजरी भजनांच्या स्वरांनी परिसर निनादून सोडला. विदर्भातील एकूण २७० मंडळांनी एकाहून एक भजने सादर केली. उद्या, शुक्रवार, दि. १८ जुलैला महाअंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले असून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस प्रदान केले जाणार आहे.
खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने सोमवारी क्वार्टर (सक्करदरा) येथील संताजी सभागृहात प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आले. दोन दिवस रंगलेल्या प्राथमिक फेरीमध्ये नागपूर शहरासह विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून एकूण २७० भजन मंडळानी सहभाग घेतला. आज, गुरुवार, दि. १७ जुलैला, स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी देखील मंडळांचा तोच उत्साह बघायला मिळाला.
बुधवारी रात्रीपासूनच विदर्भातील भजन मंडळे स्पर्धास्थळी दाखल झाली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पारंपरिक चालींवर आधारित प्रबोधनात्मक व राष्ट्रभक्तीवर आधारित विषयांवरची भजनं यावेळी मंडळांनी सादर केली.
कवीवर्य सुरेश भट सभागृहात आज महाअंतिम फेरी
विदर्भस्तरीय खंजरी भजन स्पर्धेमध्ये सहभागी २७० मधून २१ मंडळांची महाअंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात शुक्रवार, दि. १८ जुलै रोजी सकाळी ११.३० ते सायंकाळी ४.३० या वेळेत महाअंतिम फेरी रंगणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसे प्रदान करण्यात येतील.
यावेळी श्रीक्षेत्र अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठाचे श्रीनाथ पीठाधीश्वर प.पू. जितेंद्रनाथ महाराज, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस श्री. जनार्दनपंत बोथे गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती असेल.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन
खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते परीश्रम घेत आहेत. खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, गुरुदेव सेवा मंडळाचे ज्ञानेश्वर रक्षक व अशोक यावले, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे सचिव जयप्रकाश गुप्ता, उपाध्यक्ष गौरीशंकर पाराशर व माजी आमदार अशोक मानकर, कोषाध्यक्ष राजेश बागडी, बाळासाहेब कुळकर्णी, दीपक खिरवडकर, अविनाश घुशे, विजय फडणवीस, राजेश कुंभलकर, मनिषा काशीकर, किशोर पाटील, भोलानाथ सहारे, श्रीरंग वराडपांडे, दिलीप जाधव, शशांक खेकरे आदी पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात येत आहे.