Home ibmtv9 आरोग्यसेवेच्या क्षेत्रात डायग्नोस्टिक सेंटर ठरेल मैलाचा दगड!

आरोग्यसेवेच्या क्षेत्रात डायग्नोस्टिक सेंटर ठरेल मैलाचा दगड!

0
आरोग्यसेवेच्या क्षेत्रात डायग्नोस्टिक सेंटर ठरेल मैलाचा दगड!

आरोग्यसेवेच्या क्षेत्रात डायग्नोस्टिक सेंटर ठरेल मैलाचा दगड!

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

स्व. भानुताई गडकरी मोमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन

केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी, पालकमंत्री श्री. बावनकुळे यांची उपस्थिती

नागपूर – आरोग्याच्या क्षेत्रात सेवेसोबतच संवेदनेलाही तेवढेच महत्त्व आहे. नितीनजींकडे सेवा आणि संवेदना या दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळेच आईच्या नावाने डायग्नोस्टिक सेंटर सुरू करून गरिबांची सेवा करण्याचा विचार त्यांनी केला आणि तो प्रत्यक्षातही उतरवला. हे केंद्र आरोग्य सेवेच्या क्षेत्रात मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

 

लष्करीबाग येथील कमाल चौकात स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेद्वारा संचालित स्व. भानुताई गडकरी मोमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी अध्यक्षस्थानी होते. तर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री ना. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे आणि स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्ष सौ. कांचन ताई गडकरी यांची विशेष उपस्थिती होती. बेंगलुरू येथील महाबोधी सोसायटीचे जनरल सेक्रेटरी पुज्य भंते श्री. आनंद थेरा, नागपूर येथील रामकृष्ण मठाचे अध्यक्ष श्री. राघवेंद्र स्वामी, महाराष्ट्राच्या माजी मंत्री अॅड. सुलेखा कुंभारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक श्री. राजेश लोया, विशाखापट्टणम येथील एएमटीझेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जितेंद्र शर्मा, भाजपचे नागपूर शहर अध्यक्ष श्री. दयाशंकर तिवारी, आमदार संदीप जोशी, आमदार प्रवीण दटके, आमदार आशीष देशमुख, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आमदार गिरीश व्यास, माजी आमदार टेकचंद सावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, ‘स्व. भानुताई गडकरी यांच्याकडून नितीनजींना समाजकार्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळेच ते देशात मोठ्या प्रमाणात काम करू शकत आहेत. समाजातील शेवटच्या व्यक्तीचे कल्याण हा नितीनजींच्या कार्याचा केंद्रबिंदू राहिला आहे. उपेक्षितांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ते सातत्याने काम करीत आहेत. उद्योग, कृषी, आरोग्य क्षेत्रात त्यांचे विशेष कार्य आहे. याच मालिकेत डायग्नोस्टिक सेंटरचा समावेश होतो. आरोग्यसेवेच्या क्षेत्रात हे खूप मोठे पाऊल आहे.’

एकीकडे वैद्यकीय क्षेत्रात विकसित तंत्रज्ञानाचा वापर वाढला असताना सेवांचे शुल्क देखील जास्त आहे. अशात एमआरआय आणि सिटी स्कॅनच्या मशीन्स भारतीय बनावटीच्या असतील तर सेवांचे शुल्क देखील कमी राहील, असेही ते म्हणाले. त्याचवेळी भविष्यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हॉस्पिटल्सची संख्या वाढवावी लागणार असल्याचाही त्यांनी उल्लेख केला. प्राथमिक आरोग्य सुविधांच्या दृष्टीने प्रत्येक तीन किलोमीटरमध्ये आरोग्यसेवांचे नेटवर्क निर्माण करण्याचे नियोजन झाले आहे. पुढील चार वर्षांत देशातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रात असेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तसेच सिकलसेल, थॅलेसिमियावरील महागड्या उपचारासाठी एक नवीन योजना तयार करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. प्रास्ताविक सौ. कांचन ताई गडकरी यांनी केले. तर संचालन डॉ. रिचा सुगंध यांनी केले.

आईच्या संस्कारांमुळेच डायग्नोस्टिक सेंटरची प्रेरणा – ना. श्री. गडकरी

ना. श्री. नितीन गडकरी म्हणाले, ‘आईचा आशीर्वाद कायम माझ्यासोबत आहे. आजपर्यंत मी जे काही करू शकलो ते आईचे आशीर्वाद आणि तिच्या संस्कारांमुळेच शक्य झाले. प्रतिकुल परिस्थितीत जीवन जगणाऱ्या गरिबांची सेवा करण्याचे संस्कार आईने मला दिले. त्यामुळे मी पहिल्यांदा आमदार झाल्यापासून आजपर्यंत हजारो हार्ट ऑपरेशन्स करू शकलो. समाजातील वंचितांची, शेवटच्याच्या माणसाची सेवा करण्याचे, त्यांचे जीवन सुसह्य करण्याचा अंत्योदयाचा विचार पं. दिनदयाल उपाध्याय यांनी दिला. त्या मार्गावर सातत्याने कार्य करीत आहे.’ राष्ट्रकारण, समाजकारण आणि सेवाकारण, हाच राजकारणाचा खरा अर्थ आहे. त्यामुळे आपल्या कार्यातून गरिबांचे जीवन कसे बदलू शकतो, याचा विचार मी करत असतो. त्याच प्रेरणेतून अनेकांच्या सहकार्याने स्व. भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरची स्थापना होऊ शकली आहे. ज्या आईने जन्म दिला तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करू शकलो याचे समाधान आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. हे केंद्र व्यवसायाचे नव्हे तर सेवेचे माध्यम आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये सिकलसेल, थॅलेसिमिया आणि बोन मॅरोच्या उपचाराचा समावेश करण्याचे आवाहन त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केले.

देशातील पहिले मेड इन इंडिया डायग्नोस्टिक सेंटर – डॉ. जितेंद्र शर्मा

एएमटीझेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जितेंद्र शर्मा म्हणाले, ‘स्व. भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर हे देशातील पहिले केंद्र आहे, जिथे प्रत्येक मशीन मेड इन इंडिया आहे. आजपर्यंत कोणत्याही हॉस्पिटलपुढे मेड इन इंडियाचा फलक लागला नाही. आम्ही यात छोटासा सहभाग नोंदवू शकलो, हे भाग्य समजतो.’ आपल्या देशात ६४ हजार कोटींची वैद्यकीय उपकरणे आयात होतात. हा आर्थिक भार कमी करण्याच्याच उद्देशाने आमच्या संस्थेची २०१८ मध्ये विशाखापट्टणम स्थापना झाली होती. नितीनजींच्या सहकार्याने १५ हजार कोटींची वैद्यकीय उपकरणे बनवायला सुरुवात केली आहे. एमआरआय ६ कोटींमध्ये बाहेरून विकत घेतले जायचे, आज २ कोटींची उपकरणे आपण बनवतोय आणि निर्यातही करतोय. भारतातील पहिले सिटी स्कॅन, एमआरआय आम्ही बनवतो. नितीनजी केंद्रीय मंत्री म्हणून जेवढे काम करतात, त्यापेक्षा जास्त काम एक चांगला माणूस असल्यामुळे करू शकत आहेत, असेही ते म्हणाले.

स्वामी विवेकानंदांचे स्वप्न पूर्ण केले – स्वामी राघवेंद्र जी

स्वामी राघवेंद्र जी म्हणाले, ‘नितीनजींनी स्वामी विवेकानंदांचे एक स्वप्न पूर्ण केले आहे. स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेत गेले होते तेव्हा त्यांनी जमशेदजी टाटा यांना म्हटले होते की विदेशातील तंत्रज्ञान भारतात आणून आपण उत्पादन करू शकत नाही का? आज डायग्नोस्टिक सेंटरच्या निमित्ताने त्याचे साक्षात उदाहरण आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे नितीनजी आणि जितेंद्र शर्मा यांना विवेकानंदांचे विशेष आशीर्वाद मिळत आहेत.’

केंद्राच्या माध्यमातून पुण्याचे कार्य – भंते आनंद थेरा जी

भंते आनंद थेरा जी म्हणाले, ‘भगवान बुद्ध म्हणतात, ‘आरोग्य परमा लाभा, सन्तुट्ठि परमं धनं। विस्सासपरमा ञाती, निब्बानं परमं सुखं।।’. अर्थात जीवनात आरोग्याला सर्वाधिक महत्त्व आहे. शरीरासह मनाचेही आरोग्य आवश्यक आहे. नितीनजींनी आपल्या आईच्या नावाने हे केंद्र सुरू केले, ही खूप मोठी पुण्याची बाब आहे. इथे रोज चांगले कार्य होणार आहे आणि त्यासाठी आईंचे आशीर्वाद मिळत राहतील.’

यांचा विशेष सत्कार

डायग्नोस्टिक सेंटरच्या उभारणीसाठी विशेष परिश्रम घेणारे माजी नगरसेवक प्रभाकर येवले, आरोग्य सेवेच्या क्षेत्रातील योगदानासाठी संतोष यादव, प्यारे खान, अंबादास देशमुख (किशोर अवर्सेकर यांच्यावतीने), डॉ. विरल कामदार यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. त्यासोबतच विशाखापट्टणमच्या एएमटीझेड कंपनीचे साई किरण, अभिषेक सिरसकर, मिनल मारावार, दिप्ती चौहान, फरीद अली, बरनाली हजारिका तर सिक्विया हेल्थकेअरचे श्री. विश्वनाथन, डायकेअरचे अजित मिश्रा, ट्रूव्हिस लिमिटेडचे विवेक तिवारी, ट्रान्सएशियाचे चेअरमन सुरेश वझिरानी, लिटररी स्कॉलर फॉर हेल्थकेअरचे सुधीर सक्सेना यांनाही यावेळी पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यांचे विशेष परिश्रम

स्व. भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरच्या उभारणीसाठी विशेष परिश्रम घेणारे श्री. रमेश मानकर, डॉ. राजीव पोतदार, श्री. निखील गडकरी, श्री. सारंग गडकरी, श्री. अविनाश घुशे, श्री. अतुल मंडलेकर, श्रीकांत गडकरी, कवडू झाडे, हेमंत गडकरी, संजय टेकाडे यांचीही यावेळी उपस्थिती होती.

 

स्व. भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरची वैशिष्ट्ये

6000 चौरस फूटांचे बांधकाम

वेटिंग एरियासह संपूर्ण वातानुकूलित यंत्रणा

पूर्णपणे पेपरलेस कार्यप्रणाली

उच्च क्षमतेचे सर्व्हर्स

तांत्रिकदृष्ट्या पात्र व प्रशिक्षित कर्मचारी

 

एमआरआय (MRI)

मेड इन इंडिया मशिन्स

1.5 टेस्ला हाय-एंड इमेजिंग, 16 चॅनल

MUSIC तंत्रज्ञानामुळे जलद स्कॅन शक्य, इमेज क्वालिटीमध्ये कोणतीही तडजोड नाही

 

सीटी स्कॅन (CT Scan)

मेड इन इंडिया मशिन्स

मोठी शरीरयष्टी असलेल्या रुग्णांसाठी मोठे बोअर

कमी वेळात स्कॅन – संपूर्ण छातीचे स्कॅन फक्त 6 सेकंदांत

BIS, AERB, CDSCO मान्यताप्राप्त

 

डिजिटल एक्स-रे (Digital X-Ray)

उच्च दर्जाची डिजिटल एक्स-रे सेवा

डायलिसिस (Dialysis)

5 उच्च दर्जाच्या डायलिसिस मशिन्स

स्व. भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा

*एमआरआय* १२०० रुपये

*सिटी स्कॅन* ८०० रुपये

*डायलिसीस* ७५० रुपये

*डिजीटल एक्स-रे* १०० रुपये

*पॅथालॉजी* ३०० रुपयांत ४० प्रकारच्या रक्त तपासण्या

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here