
विभागीय रेल्वे रुग्णालय, नागपूर येथे जागतिक स्तनपान सप्ताह साजरा
नागपूर : प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो, ज्याचा उद्देश बालक व मातांच्या आरोग्यासाठी स्तनपानाचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत 7 ऑगस्ट 2025 रोजी विभागीय रेल्वे रुग्णालय, नागपूर येथे आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या वर्षीची थीम होती – “स्तनपानास प्राधान्य द्या: शाश्वत सहाय्य प्रणाली निर्माण करा”, जी यशस्वी स्तनपानासाठी आरोग्य व्यवस्था व समाजाकडून सातत्यपूर्ण पाठबळ आवश्यक असल्याचे दर्शवते. या कार्यक्रमात वरिष्ठ विभागीय वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोगतज्ज्ञ) डॉ. शुभांगी साखरे यांनी स्तनपानाचे पोषणमूल्य आणि भावनिक फायदे विषद करणारी ऑडिओ-व्हिज्युअल सादरीकरण केले. त्यांनी सांगितले की जीवनाच्या पहिल्या सहा महिन्यांत स्तनपान अत्यावश्यक असून ते आई व बाळातील नाते बळकट करते.
बालरोगतज्ज्ञ डॉ. मंगेश चौधरी यांनी मुलांमध्ये वाढणाऱ्या मानसिक आरोग्याच्या समस्या मांडल्या आणि स्तनपानामुळे होणाऱ्या सुरुवातीच्या भावनिक संबंधांचे त्यावर सकारात्मक परिणाम सांगितले. मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. निर्मला गुप्ता यांनी उपस्थितांना उद्देशून “रूमिंग-इन” सारख्या कृतींचे पालन करणे व रुग्णालयात बाळ–मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करणे किती महत्त्वाचे आहे, हे सांगितले. या कार्यक्रमाद्वारे स्तनपान ही सामायिक जबाबदारी असल्याचा संदेश दिला गेला आणि आरोग्य सेवक, कुटुंबीय व समुदाय यांच्यात समन्वय साधून नवमातांना पाठबळ देण्याचे आवाहन करण्यात आले.