जिल्ह्यातील प्रत्येक गोरगरिबांना घरे हेच ध्येय – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे पात्र व्यक्तिंना तात्काळ पट्टे वाटप करण्याचे निर्देश
प्रत्येक जिल्ह्यात 2 हजार बचत गटांना 1 लाख रुपये खेळते भांडवल
नागपूर : एकही व्यक्ती स्वत:च्या पक्क्या घरापासून वंचित राहू नये हा शासनाने निर्धार केलेला आहे. ज्या गोरगरिबांना गतकाळात कुठेच आसरा मिळाला नाही अशा लोकांनी आडवळणी असलेल्या झुडपी क्षेत्रात आसरा घेतला आहे. यातील 1996 पूर्वीपासून असलेल्या ज्या व्यक्तींकडे पुरावे आहेत ते लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही परिस्थितीत या लोकांना मार्च पूर्वी पट्टे वाटप करण्याचे निर्देश महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजनेसह शासनाच्या इतर योजनांचा समन्वय साधून अधिकाधिक लोकांना घरे देण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून सुमारे 30 लाख घरे प्रधानमंत्री आवास योजनेत उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.
नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या महसूल विभागाच्या विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस वित्त व कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार चरणसिंग ठाकुर, आमदार संजय मेश्राम, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे, अतिरिक्त आयुक्त तेजूसिंग पवार, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, गडचिरोली जिल्हाधिकारी अविशांत पंडा, वर्धा जिल्हाधिकारी वान्मथी सी, भंडारा जिल्हाधिकारी सावन कुमार, गोंदिया जिल्हाधिकारी प्रजित नायर, चंद्रपूर अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे व वन विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी नैसर्गिक न्यायाच्या भुमिकेतून आपण पट्टे वाटपाचा निर्णय घेतला. हजारो गोरगरिबांना त्यांच्या मालकीचे पट्टे यातून मिळाले. झुडपी क्षेत्रामध्ये गत अनेक वर्षांपासून लोक वास्तव्यास आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार पात्र व्यक्तींना प्रत्येक तालुक्यात कालमर्यादेत तहसिलदारांनी कार्यवाही केली पाहिजे. येत्या काळात निवडणुकांच्या कामकाजासह या कामांनाही तेवढेच प्राधान्य सर्व महसूल यंत्रणेने देणे आवश्यक आहे. विधानसभेमध्ये याबाबत व्यापक चर्चा झाली असून कोणत्याही स्थितीत प्रशासकीय पातळीवरची दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.
नुकत्याच झालेल्या नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांना सावरता यावे यासाठी शासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करुन मदतीचा निर्णय घेतला. विदर्भातील धान उत्पादक पट्ट्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यातील धान उत्पादक शेतकरी पंचनाम्यापासून जर सुटले असतील तर अशा शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करुन त्याबाबत शासनाला सादर करा. कोणताही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व अधिकाऱ्यांना सांगितले.
वाळूचा गैरव्यवहार आढळल्यास
संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई
सर्वसामान्यांना घरासाठी सहज व सुलभ पद्धतीने वाळू उपलब्ध व्हावी यासाठी आपण नवे वाळू धोरण जाहीर केले. यात विविध घाटांच्या लिलावात पारदर्शकता आणली आहे. जे वाळू घाट निश्चित करण्यात आले आहेत त्या वाळूघाटाच्या एकूण उपलब्ध वाळूच्या दहा टक्के वाळू ही घरकुलासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची व कुठेही सामान्य व्यक्तीची अडवणूक होणार नाही असा शासन निर्णय आपण जाहीर केला आहे. एवढे सारे स्पष्ट असतांना वाळूबाबत कोणत्याही महसूल अधिकाऱ्याने गैरप्रकार केल्याचे आढळल्यास सेवा समाप्त करु असा इशारा त्यांनी दिला.
प्रत्येक जिल्ह्यात दोन हजार महिला बचत गटांना एक लाख रुपयांचे सहाय्य
शहरी भागासह ग्रामीण भागातील महिलांना विकासाच्या प्रवाहात आणता यावे यासाठी नागपूर मधील सुमारे 8 हजार महिला बचत गटांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे खेळते भांडवल आपण देण्याचा निर्णय घेतला. यातील 1600 बचत गटांना आपण पहिल्या टप्प्यात निधी वितरणास दोन दिवसापूर्वी शुभारंभ केला. याच धर्तीवर इतर जिल्ह्यांमध्ये सुमारे दोन हजार बचत गटांना प्रत्येकी एक लाख रुपये भांडवलासाठी देण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. रस्ते व इतर विकास कामा इतकेच बचत गटांना स्वयंरोजगाराचे मार्ग भक्कम करुन देणे महत्वाचे आहे. हे लक्षात घेऊन वेळप्रसंगी जिल्हा वार्षिक योजनेतूनही यासाठी तरतूद करण्याबाबत त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची आवश्यकता लक्षात घेऊन याबाबत आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा
महसूल अधिकारी संघटनेकडून सत्कार
महसूल विभागात गत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बढत्यांचा प्रश्न प्रशासकीय पातळीवर मार्गी लावून यात अत्यंत पारदर्शकतेने निर्णय प्रक्रियेबद्दल महसूल अधिकारी संघटनेच्यावतीने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला. तहसिलदारांपासून अपर जिल्हाधिकारी व भारतीय प्रशासकीय सेवेच्या बढतीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.


