नागपूर पुस्तक महोत्सवात उस्फूर्तपणे सहभागी व्हा – कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे
नागपूर : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय अंतर्गत राष्ट्रीय पुस्तक न्यास यांच्या वतीने शहरातील रेशीम बाग मैदान येथे २२ ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान आयोजित नागपूर पुस्तक महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन माननीय कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ स्वायत्त शैक्षणिक विभाग, संचालित तसेच संलग्नित महाविद्यालयातील प्राचार्य, रासेयो समन्वयक तसेच ग्रंथपालांच्या सोमवार, दि.१० नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या ऑनलाईन बैठकीत कुलगुरूंनी मार्गदर्शन केले.
बैठकीचे अध्यक्षस्थान कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी भूषविले, यावेळी राज्यपालनामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. देवेंद्र भोंगाडे, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. राजश्री वैष्णव, ज्ञानस्त्रोत केंद्र संचालक डॉ. विजय खंडाळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ चे संचालक डॉ. रविशंकर मोर, डॉ. प्रकाश ईटनकर यांची उपस्थिती होती.
राज्यपालनामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड यांनी यावेळी नागपूर पुस्तक महोत्सवात आयोजित संपूर्ण कार्यक्रमाची माहिती दिली. साहित्य तसेच वाचनाची आवड निर्माण करण्याचे कार्य राष्ट्रीय पुस्तक न्यास संपूर्ण देशात करीत आहे. वाचन संस्कृतीत वाढ व्हावी यासाठी नागपूर पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून ३२५ स्टॉल्स महोत्सवात लागणार असून १५ लाख पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे. देशभरातील प्रकाशक या पुस्तक महोत्सवात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या सोबतच लिटरेचर फेस्टिवल, सांस्कृतिक कार्यक्रम, मुलांसाठी विविध कार्यक्रम-कार्यशाळा या दरम्यान आयोजित केले जाणार आहे. कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्यासह अन्य मंत्री त्याचप्रमाणे विख्यात साहित्यिक संवाद साधणार आहे. या नागपूर पुस्तक महोत्सवात प्राचार्य, सर्व प्राधिकारणी सदस्य, अभ्यास मंडळाचे सदस्य, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषण करताना कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी आपल्या परिसरातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देखील सहभागी करून घेण्याची जबाबदारी महाविद्यालयांनी उचलली पाहिजे असे आवाहन केले. विद्यापीठ म्हणजेच प्रत्येक महाविद्यालय नागपूर पुस्तक महोत्सवात सहभागी असल्याचे डॉ. हिवसे यांनी सांगितले. नागपूर पुस्तक महोत्सव यशस्वी करण्याची आपली सर्वांची जबाबदारी असल्याची देखील त्यांनी सांगितले.
बैठकीचे प्रास्ताविक करताना ज्ञानस्त्रोत केंद्र संचालक डॉ. विजय खंडाळ यांनी बैठक आयोजित करण्यामागील भूमिका विशद केली. नागपूर पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने होत असलेल्या तयारी बाबत त्यांनी माहिती दिली तसेच शेवटी सर्व उपस्थित आमचे आभार त्यांनी मानले. ऑनलाइन बैठकीची व्यवस्था आयटी समन्वयक श्री सतीश शेंडे यांनी सांभाळली.


