विवेकानंदन कॉलेज परिसरात बिबट्याचा दीड तास थरार, अखेर जेरबंद !
IBMTV9 DIGITAL NEWS : नागरी वसाहती मध्ये बिबट्या घुसल्याने एकच खळबळ उडाली होती. तो आता जेरबंद झाला आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या हुशारीने या बिट्याला पिंजराबंद केले आहे. सोमवारच्या मध्यरात्री पासून बिबट्याने कोल्हापूर शहरात धुमाकुळ घातला होता. बिबट्याने एका पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केला. चेंबरच्या आत शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला दीड तासानंतर अखेर यश मिळाले आहे.

कोल्हापूर येथील ताराबाई पार्क परिसरातील एका हॉटेलच्या गार्डनमध्ये उडी घेत त्याठिकाणी काम करत असलेल्या एका कर्मचाऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. यानंतर याच ठिकाणी असलेल्या महावितरणच्या कार्यालयात एका चेंबरमध्ये बिबट्या लपून बसला. बिबट्या नेमका कुठून आला याबाबत अध्यापही संभ्रम आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहरात बिबट्याचा वावर अधिकच वाढला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. कोल्हापूरच्या पन्हाळा, ज्योतिबा, सादळे मादळे परिसरात बिबट्याचा वावर आहे. मात्र मंगळवार ११ नोव्हेंबर रोजी शहरातच बिबट्या घुसल्याने नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. दुपारी २ वाजताच्या दरम्यान वनविभागाच्या चमूने बिबट्याला चेंबर मधून जेरबंद केले. परिसरात वनविभागाच्या चमूसह पोलीस प्रशासन, मनपा अग्निशमन दल, वाहतूक नियंत्रण विभाग तैनात करण्यात आलेला होता.


