कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी घेतले राष्ट्रसंताच्या समाधीचे दर्शन
पदभार स्वीकारताच नागपुरवरून पोहचल्या थेट गुरुकुंजात
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षिरसागर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर थेट नागपूर येथून श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम (मोझरी) येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचे आज (दि. ३ डिसेंबर) दर्शन घेतले व आश्रमिय परिसराची संपूर्ण माहिती जाणून घेतली.
अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या ज्या राष्ट्रसंतांच्या नावे विद्यापीठ आहे, त्या महामानवाच्या महासमाधीला नतमस्तक होऊन विद्यापीठाच्या खुर्चीवर बसण्याची ईच्छा ठेवून आज मी नागपूर येथून थेट गुरुकुंज आश्रम येथे आली असल्याचे मनोगत याप्रसंगी कुलगुरू डॉ. क्षीरसागर यांनी व्यक्त केले व येथील परिसर पाहून मी अक्षरशः भारावून गेले. येथून एक नवी ऊर्जा व राष्ट्रसंतांचे आशीर्वाद घेऊन मी विद्यापीठातून एक सुसंस्कारित पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
यावेळी त्यांच्यासह विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजू हिवसे, ज्ञानस्रोत केंद्र संचालक डॉ. विजय खंडाळ, स्वीय सहाय्यक श्री नितीन खरबडे तसेच अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामंडळाचे सर्वाधिकारी श्री. प्रकाश महाराज वाघ, सरचिटणीस जनार्दनपंत बोथे, उपसर्वाधिकारी बाबाराव पाटील, प्रचार प्रमुख गोपाल कडू, गुलाब खबसे, डॉ पाळेकर, मुख्याध्यापक मनोज कडू, डॉ. जनसेवक जयस्वाल, अध्यात्म विभागाचे प्रमुख डॉ. राजाराम बोथे, अमोल बांबल आदी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महारांजाच्या संपूर्ण कार्याची तसेच आश्रमिय परिसराची माहिती प्रा. अरविंद राठोड यांनी कुलगुरू यांना सांगितली. आश्रमिय परिसर बघितल्यावर कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रंथसंपदा, ग्रामगीता,शाल, श्रीफळ भेट देऊन अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले.


