‘रबी’त रोहित्र जळण्याचे संकट टाळा; कृषिपंपांना ‘कॅपॅसिटर’ बसवा!
महावितरणचे आवाहन: ‘ऑटोस्विच’चा वापर टाळल्यास वीजपुरवठा राहणार सुरळीत
नागपूर : रबी हंगामाची धामधूम सुरू झाली असून शेतीसाठी विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या काळात अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी महावितरण सज्ज असले, तरी तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. कृषिपंपांचे नुकसान आणि रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) जळण्याचे प्रकार रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘ऑटोस्विच’चा वापर टाळून ‘कॅपॅसिटर’ बसवावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
‘ऑटोस्विच’ ठरतोय धोक्याचा!
अनेक शेतकरी वीज येताच शेतात जाण्याचा त्रास वाचवण्यासाठी पंपांना ‘ऑटोस्विच’ लावतात. मात्र, यामुळे वीज पुरवठा सुरू होताच परिसरातील सर्व पंप एकाच वेळी सुरू होतात. परिणामी, रोहित्रावर (Transformer) अचानक प्रचंड भार येतो आणि रोहित्र जळणे किंवा वीजवाहिन्या नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते. ऐन हंगामात वीजपुरवठा खंडित झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.
कॅपॅसिटरचे बहुविध फायदे:
कृषिपंपाला क्षमतेनुसार कॅपॅसिटर बसवणे हा तांत्रिक बिघाड टाळण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. ‘कॅपॅसिटर’मुळे कमी दाबाच्या (Low Voltage) समस्येपासून सुटका मिळते. केबल जळण्याचे प्रमाण कमी होते आणि मोटार सुरक्षित राहते. योग्य विद्युत दाबा मुळे वीज वापरात बचत होऊन ‘केव्हीए’ (kVA) मागणी मर्यादित राहते. याशिवाय, रोहित्र जळण्याचे प्रमाण घटल्याने दुरुस्तीसाठी लागणारा वेळ आणि खंडित वीजपुरवठ्याचा त्रास वाचतो.
शेतकऱ्यांनी ज्या पंपांचे कॅपॅसिटर बंद आहेत ते दुरुस्त करावेत आणि ज्यांनी अद्याप बसवले नाहीत त्यांनी ते तातडीने बसवून घ्यावेत. कार्यक्षम ऊर्जा वापरासाठी कॅपॅसिटर हे अत्यंत महत्त्वाचे साधन असल्याचेही महावितरणने स्पष्ट केले आहे
काही ठिकाणी कॅपॅसिटर असूनही ते थेट (Direct) जोडलेले असतात किंवा बंद अवस्थेत असतात. अशा स्थितीत तांत्रिक लाभ मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने जोडणी करून महावितरणला सहकार्य करावे, जेणेकरून रबी हंगामात सिंचनासाठी कोणताही अडथळा येणार नाही. असे देखिल स्पष्ट करण्यात आले आहे.


