विद्यापीठात क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धांचा ‘युवास्पंदन’
क्रिकेट स्पर्धेने युवास्पंदन महोत्सवास सुरुवात
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागाचा क्रीडा व सांस्कृतिक ‘युवास्पंदन’ महोत्सवास सोमवार, दि.९ मार्च २०२६ रोजी क्रीडा स्पर्धेने सुरुवात झाली. युवास्पंदन महोत्सव अंतर्गत विविध क्रीडा तसेच सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन ९ ते १८ मार्च २०२६ दरम्यान करण्यात येणार आहे.

माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे प्रभारी संचालक डॉ. संभाजी भोसले यांच्या शुभहस्ते फित कापून या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जनसंपर्क अधिकारी प्रेमदास वाडकर, युवास्पंदन सांस्कृतिक महोत्सवाच्या अध्यक्ष सृष्टी बोरकर, सचिव संकेत रायपुरे, आशय यावले यांची यावेळी उपस्थिती होती.

डॉ. संभाजी भोसले यांनी मार्गदर्शन करताना खेळ भावनेतून विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. खेळ भावनेतून कोणत्याही स्पर्धेत उतरल्यास आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असल्याचे त्यांनी सांगितले. युवास्पंदन महोत्सवात विद्यार्थी व विद्यार्थिनींचे क्रिकेट सामने, विद्यार्थ्यांचे हॉलीबॉल सामने, विद्यार्थी- विद्यार्थिनींचे टग ऑफ वार सामने, बुद्धिबळ, रांगोळी, मेहंदी, खाद्य महोत्सव, ट्रेजर हंट, वादविवाद, गायन स्पर्धा, समूह गान, फॅशन शो, एकल नृत्य, मिस्टर अँड मिस कॅम्पस आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.


