“कहीं हम भूल न जायें” अभियानाद्वारे महाराष्ट्रात “आंबेडकर मेळा ऑन व्हील्स” चे राज्यव्यापी आयोजन
नागपूर : बाबासाहेब डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्ताने महाराष्ट्रातील संपूर्ण छत्तीसही जिल्ह्यांमध्ये आंबेडकरवादी चळवळीप्रती जनजागृती निर्माण करण्याकरिता दोन महिन्याच्या कालावधीत सात टप्प्यांमध्ये “चालत्या फिरत्या आंबेडकर मेळ्याचे” (“आंबेडकर मेळा ऑन व्हील्स” चे) भव्य राज्यव्यापी आयोजन करण्यात येत आहे. मान्यवर कांशीरामजी यांच्या जयंती पासून म्हणजे 15 मार्च 2026 पासून मेळ्याची सुरुवात होत आहे. आणि मेळ्याचे समापन 17 मे 2026 ला आठव्या बहुजन परिषदेच्या माध्यमातून होणार आहे.
या आयोजनाद्वारे फुले-शाहू-आंबेडकरांचे परिवर्तनवादी विचार महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांमध्ये पोहोचविण्याचा उदात्त हेतू आहे. प्रत्येक जिल्ह्यातील तहसील आणि प्रमुख शहरांमध्ये जाऊन, चौकाचौकांमध्ये नुक्कड सभा घेऊन महापुरुषांच्या विचारसंवर्धनाचे कार्य पार पाडल्या जाणार आहे. या मेळ्यामध्ये विद्यार्थी, महिला, पुरुष व कर्मचारी या सर्वांचा समावेश असणार आहे. “आंबेडकर मेळा ऑन व्हील्स” च्या या राज्यव्यापी कार्याला महाराष्ट्रातील जनतेने सहकार्य करावे असे आवाहन “कहीं हम भूल न जायें” अभियानाचे ॲड. अतुल पाटील यांनी केले आहे.


