मुंबई: मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. या परिसराचा पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीने विकास करून तो अधिक आकर्षक करण्यात येईल, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
गेट वे ऑफ इंडिया परिसराचा विकास करण्यासाठी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. खासदार अरविंद सावंत, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे आदी यावेळी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गेट वे ऑफ इंडियाच्या मुख्य भागाची आणि घुमटाची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर परिसरातील विविध सोयी सुविधांची दुरूस्ती अथवा पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे. यासाठी परिसरातील सुविधांची सुयोग्य रचना करण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा परिसर आकर्षक करून येथे ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत 75 फुट उंचीचा ध्वज उभारण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. सुरक्षारक्षकांची कॅबिन, स्वच्छतागृह, जुने वैभव दर्शविणारे पथदिवे, परिसराची माहिती देणारे फलक, रस्त्याच्या दुभाजकांवर लहान ध्वज लावण्यासाठी खांबांची रचना आदी सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.