पहिल्यांदाच हिवाळी अधिवेशनाचे हायटेक कामकाज !
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या सत्राला सोमवार 19 डिसेंबर पासून प्रारंभ झाला. सभागृहातील सर्व सदस्यांना नव्या लॅपटॉपसह, वायफाय व अन्य विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. विधिमंडळ सत्रातील उपलब्ध सुविधांबाबतचे नवे कोरे ॲप तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्येक सदस्यांकडे उपलब्ध केलेली डीजीटल माहिती पुस्तिका यामुळे यावेळेचे अधिवेशन अधिक हायटेक व नवीन सुविधांसह सुरू झाले आहे.
विधानभवन परिसर आणि बाहेरील व्यवस्थाही चोख ठेवण्यात आली आहे. ट्रॅफिक आणि पार्किंगचे नियोजन करण्यात आले आहे. विधिमंडळ परिसर आणि शहरातील महत्वाच्या ठिकाणांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे. महिला पोलिसांसाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे.
महिला आमदारांसाठी विधानभवनात शिशू संगोपन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याशिवाय पत्रकारांसाठी अतिरिक्त कक्ष उभारण्यात आला आहे. इलेक्ट्रानिक्स माध्यमांसाठी परिसरात वेगळा हायटेक कक्ष उभारण्यात आला आहे. एवढेच नव्हेतर पत्रकारांसाठी सत्ताधाऱ्यांच्या वतीने परिसरातच भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
अधिवेशनासाठी येण्यासाठी व जाण्यासाठी रेल्वे आणि विमान प्रवासासाठी नियोजन करण्यात आले आहे. विमानाच्या अतिरिक्त फेऱ्या सुटीच्या दिवसांमध्ये वाढविण्यात येणार आहेत.
नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील सेटट्राईब या आयटी कंपनीच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या “महा असेंम्बली” या ॲप द्वारे मंत्री, आमदार, सचिव स्तरावरील पदाधिकारी यांना अधिवेशनादरम्यान त्यांची निवास व्यवस्था, अधिवेशन दैनंदिनी, महत्वाच्या व्यक्तींची टेलिफोन निर्देशिका, इतर महत्वाचे सहाय्य, विविध बैठकांचा तपशील एका क्लिक वर मिळत आहे. अँड्रॉइड ॲप, वेब व्यू तसेच ॲपल स्टोरवर हे ॲप उपलब्ध आहेत. फक्त अधिकृत सदस्यांनाच या ॲपचा वापर करता येतो, हे विशेष.
याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाने स्थळदर्शक गुगल नकाशा असलेली माहिती पुस्तिका प्रत्येक सदस्यांच्या कक्षामध्ये व स्विय सहाय्यकांकडे उपलब्ध करुन दिली आहे. डिजीटल हाऊस किपींग, कपडे धुणे, भोजन सेवा, मदतनीस सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे. याशिवाय निवास व अन्न बाबतीत असणाऱ्या कोणत्याही तक्रारीचा निपटारा १५ मिनिटात करण्याची तयारी विभागाने केली आहे.


