भवन्स शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच चिमुकल्या सारंगचा मृत्यू !
बराच वेळ होता खड्ड्यात पडला, वेळीच उपचार मिळाला नाही
नागपूर : भवन्स शाळा प्रशासनाने नव्या इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडल्यामुळेच सारंग ह्या चिमुकल्या विद्यार्थ्याचा मृत्यु झाला. जर त्या खड्ड्याला सुरक्षा कवच दिला असता तर कदाचित सारंगचा जीव वाचला असता. त्यामुळे सारंगच्या मृत्युला शाळा प्रशासनच जबाबदार असून बेजबाबदार प्रशासनावर मानववधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील कळमेश्वर आष्टी परिसरात भारतीय विद्या भवन शाळा आहे. एका बड्या नेत्याची ही शाळा आहे. गुरुवार (२ नोव्हेंबर) सारंग होमेश्वर नागपूरे वय ८ वर्ष राहणार जयताळा या चिमुकल्यासाठी हा दिवस काळ ठरला. भारतीय विद्या भवन शाळेतील तिसऱ्या वर्गात सारंग शिकत होता. गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास सारंग हा वर्ग मित्रांसोबत फुटबॉल खेळत होता. अचानक सारंगचा तोल गेला व तो शाळेच्या नव्या इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडला. खड्ड्याच्या काठावर असलेला मोठ्ठा दगड सारंगच्या डोक्यावर पडला. तो गंभीर जखमी झाला.

बराच वेळ तो जखमी अवस्थेत खड्ड्यातच पडून राहला. काही वेळानी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना घटनेची माहिती दिली. शिक्षकांनी जेव्हा सारंगला खड्ड्यातून बाहेर काढले त्यावेळी सारंग बेशुद्ध अवस्थेत होता. शिक्षकांनी सारंगला उपचारासाठी एलिक्सिस रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान चिमुकल्या सारंगची प्राणज्योत मालवली. सारंगला वेळीच उपचार मिळाला असतातर कदाचित सारंगचा जीव वाचला असता. भारतीय विद्या भवन शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच सारंगचा मृत्यु झाला. शाळा प्रशासनावर मानववधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.


