क्रिम्स हॉस्पिटलमध्ये अंगठ्याच्या पुनर्रोपणाची जटिल शस्त्रक्रिया यशस्वी
नागपूर : येथील रामदपेठ स्थित क्रिम्स हॉस्पिटल्सने जटिल आणि गुंतागुंतीची अंगठ्याच्या पुनर्रोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडत आपल्या किर्तीमानात अजून एक मानाचा तुरा रोवला आहे. मध्यप्रदेशातील एका फार्मसीच्या विद्यार्थ्यावर हि दुर्धर शस्त्रक्रिया भर मध्यरात्री पार पडली.
आपल्या स्पोर्ट्स बाईकच्या चेनला ग्रीसिंग करताना अचानक ग्रीसिंगचा कापड अडकून त्याचा अंगठा गाडीच्या चेनमध्ये ओढल्या गेला. परिणामी त्याच्या उजव्या हाताचा अंगठा अर्ध्याहून अधिक तुटला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन मज्जातंतूंच्या ऊतींना आणि रक्तवाहिन्यांना गंभीर दुखापत झाली होती.
सुरुवातीला, रुग्णाच्या कुटुंबीयांनी स्थानिक रुग्णालयात धाव घेतली. परंतु, जिथे त्यांना उच्च शस्त्रक्रिया तंत्रज्ञानासह सुसज्ज रुग्णालयात उपचार घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आणि नागपूर येथील क्रिम्स हॉस्पिटल्समध्ये नेण्यास सांगितले. तसेच क्रिम्स हॉस्पिटल्ससोबत संपर्क साधून रुग्ण नागपूरसाठी निघत असल्याचे सांगितले. रुग्णाचा तपशील मिळताच हॉस्पिटल प्रशासनाने रूग्णाच्या प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी हॉस्पिटल परिसरात ग्रीन कॉरिडॉर लागू करण्यात आला.
शस्त्रक्रिया विभागाची चमू, वैद्यकीय पथक कार्यक्षमतेने आणि कौशल्याने कामाला लागले. परिचारिका, कर्मचारीवर्ग संपूर्ण चमू सज्ज झाली. रुग्ण हॉस्पिटल्सला पोहोचताच, कागदपत्रांशी संबंधित कोणताही विलंब टाळून, 10 मिनिटांत शस्त्रक्रिया सुरू झाली. क्रिम्सच्या शस्त्रकिया विभागाने प्रगत शस्त्रक्रिया सुविधा आणि अत्याधुनिक सर्जिकल
मायक्रोस्कोपचा वापर करून जटिल अशी अंगठ्याची पुनर्रोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. आपण कल्पना करू शकतो की उजव्या हाताचा अंगठा नसेल तर दैनंदिन कामकाजापासून तर उभ्या आयुष्यातील अनेक गोष्टी किती कठीण होऊन बसतील. शस्त्रक्रिया विभागाची अचूकता, उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक टीमवर्कमुळे आज एका तरुणाचे भवितव्य सुरक्षित होऊ शकले. रुग्णाची तब्येत स्थिरावल्यानंतर दोन दिवसांनी त्याला सुटी देण्यात आली.