मतदान व मतदारांसाठी जिल्हा प्रशासन सदैव दक्ष
– जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर
नागपूर : मतदानासाठी उपयोगात आणलेल्या सर्व इव्हीएम मशिन्स पोलिसांच्या देखरेखीखाली कळमना येथे स्ट्राँग रुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून या ठिकाणी काटेकोर बंदोबस्त लावण्यात आला आहे. नागपूर व रामटेक मतदार संघात अनुक्रमे सहा विधानसभा मतदार संघ आहेत.
प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी अनुक्रमे 20 टेबल्स लावण्यात आले आहेत. सहा मतदार संघासाठी ही संख्या 120 टेबल्स एवढी एका लोकसभा मतदार संघासाठी राहील. निकालासाठी सुमारे 17 मतमोजणी फेऱ्या पुरेशा ठरतील, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आज पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार उपस्थित होते. मतदानाचे प्रमाण कमी झाले असले तरी मागील लोकसभा निवडणूकीच्या तुलनेत एकूण 24 हजार 837 इतके मतदार वाढले आहेत.
19 एप्रिल रोजी ज्या मतदारांना मतदान करता आले नाही त्यांनी नमूना 7 व 8 भरुन सादर करावा. यापूढेही आम्ही मतदारांनी मतदान करावे व कुठल्याही मतदाराला मतदानापासून वंचित राहता येऊ नये यासाठी त्याच सचोटीने प्रामाणिक प्रयत्न करु, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्या काही तांत्रिक अडचणीमुळे मतदारांचे प्रश्न निर्माण झाले त्या बाबींची कार्यालयीन शहानिशा करुन त्यांचे नाव मतदार यादीत घेतले जाईल, असे जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी सांगितले.