वोक्हार्ट हॉस्पिटल्सची किडनी संवर्धनासाठी तत्परता
वाढत्या किडनी समस्यांचा धोका ओळखत जागतिक किडनी दिनानिमित्त कृतीतून दर्शविली वचनबद्धता
नागपूर : भारतामध्ये किडनीशी संबंधित आजार वेगाने वाढत आहेत. क्रॉनिक किडनी आजार, किडनी स्टोन्स आणि अॅक्युट किडनी इंज्युरीसारख्या समस्या मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. जागतिक किडनी दिन २०२५ हा “तुमच्या किडन्या ठीक आहेत का? लवकर ओळखा, किडनीचे आरोग्य जपा’’ या जनजागृती घडविणाऱ्या संकल्पनेवर साजरा होत आहे. वाढत्या किडनी समस्यांचा धोका ओळखत नागपूर येथील वोक्हार्ट हॉस्पिटल किडनी आरोग्य संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवत आपली तत्परता स्पष्ट करत आहे. जागतिक किडनी दिनाच्या निमित्ताने वोक्हार्ट हॉस्पिटल्सतर्फे किडनी विकारग्रस्त रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अंगदान करीत अमूल्य योगदान देणाऱ्या निःस्वार्थ व्यक्ती व त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी आयोजित कार्यक्रमात किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ व नेफ्रोलॉजिस्ट डॉ. सुर्याश्री पांडे यांनी अंगदानासंदर्भात सखोल मार्गदर्शन केले. तसेच, जिवंत किंवा मृत्यू पश्चात किडनी प्रत्यारोपण करून एखाद्या रुग्णाचे जीवन वाचवले आहे अशा व्यक्तींच्या प्रेरणादायी कथा यावेळी सर्वांसोबत सामायिक करण्यात आल्या. हे अनुभव उपस्थितांसाठी अंत्यंत प्रेरणादायी ठरले. जिवंत व मृत्यू पश्चात अंगदानातील फरक डॉ. पांडे यांनी यावेळी स्पष्ट केला ज्यामुळे उपस्थितांना किडनी प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णांकरिता उपलब्ध पर्यायांची व्यापक माहिती मिळाली आणि अवयवदानामुळे रुग्ण, त्यांचे कुटुंब आणि समाजावर कसा सकारात्मक परिणाम होतो याची जाणीव झाली. अंगदान केवळ रुग्णालाच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबियांना आणि संपूर्ण समाजाला मदत करू शकते हे यातून स्पष्ट झाले. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांसाठी विशेष किडनी केअर पॅकेज कुपन्स उपलब्ध करून देण्यात आले, ज्यामध्ये किडनी आरोग्यासाठी आवश्यक तपासण्या आणि उपचार समाविष्ट आहेत.
अलीकडील आकडेवारीनुसार, भारतातील प्रत्येक सात प्रौढ व्यक्ती पैकी एक व्यक्ती किडनी विकाराने ग्रस्त आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे यामागील प्रमुख कारणे आहेत. अनियमित आहार, स्थूलता, गतिहीन जीवनशैली आणि वाढलेला ताण हे देखील किडनीच्या समस्यांमध्ये भर घालणारे घटक आहेत, अशी माहिती तज्ञांनी यावेळी दिली.
१३ मार्च २०२५ रोजी साजरा होत असलेला जागतिक किडनी दिन हा किडनी आरोग्याच्या महत्त्वावर भर देणारा आहे. क्रॉनिक किडनी आजार हा “सायलेंट किलर’’ मानला जातो, कारण त्याची सुरुवातीची लक्षणे स्पष्ट दिसत नाहीत. लक्षणे केवळ उशीराच्या टप्प्यात दिसून येतात, जेव्हा उपचार अधिक कठीण होतात. याकरिता किडनीचे आरोग्य जपण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. किडनीचे आरोग्य टिकवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण प्रतिबंधात्मक उपाय यावेळी तज्ञांनी सुचविले. संतुलित आहार जसे कि ताज्या फळभाज्या, संपूर्ण धान्य आणि प्रथिनयुक्त पदार्थ भोजनामध्ये असायला हवे त्यांनी सांगितले. तसेच मीठ आणि साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी त्यांनी पुरेशे पाणी पिण्यावर भर दिला जेणेकरून किडनीच्या कार्यक्षमतेला मदत होईल आणि किडनी स्टोन्स होण्याचा धोका कमी होईल. नियमित वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असून, रक्तदाब, रक्तातील साखर आणि किडनी कार्य तपासणी करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला ज्यामुळे संभाव्य समस्या लवकर ओळखता येऊ शकतील. यावेळी स्थूलता आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास दैनंदिन व्यायाम करण्यावर सुद्धा त्यांनी भर दिला. किडनीचे दीर्घकालीन नुकसान टाळण्यासाठी धूम्रपान आणि मद्यपान टाळण्याचाही सल्ला डॉक्टरांनी दिला.औषधांचा योग्य वापर करावा,डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक किंवा इतर औषधे जास्त प्रमाणात घेऊ नयेत,कारण काही औषधांमुळे किडनीला हानी पोहोचू शकते, असे त्यांनी सांगितले.
किडनी प्रत्यारोपण हा शेवटच्या टप्प्यातील किडनी विकारग्रस्त रुग्णांसाठी जीवनदान ठरू शकतो अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. सध्या भारतात २ लाखांहून अधिक लोक किडनी ट्रान्सप्लांटच्या प्रतीक्षेत आहेत, असे राष्ट्रीय अवयव व ऊतक प्रत्यारोपण संस्था (नोट्टो) च्या अहवालात नमूद आहे. अंगदानाची गरज लक्षात घेता, समाजात जाणीवजागृती आणि कृती करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. अंगदान हा केवळ परोपकाराचा नव्हे तर एखाद्याचे जीवन वाचवण्याचा संकल्प आहे. अंगदान करण्याचा निर्णय घेतल्यास, एखाद्या गरजू व्यक्तीला आरोग्य, आयुष्य आणि कुटुंबासोबत अधिक काळ घालवण्याची संधी मिळू शकते.
जागतिक किडनी दिनानिमित्त, आपण सर्वांनी एकत्र येऊन किडनी आरोग्य जागरूकता वाढवली पाहिजे. आम्ही उत्कृष्ट किडनी केअर आणि ट्रान्सप्लांट सेवा देण्यास कटिबद्ध आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या मदतीने आम्ही एकाच छताखाली सर्व आवश्यक तपासण्या करून वेळीच निदान आणि उपचार करण्याची सुविधा देत आहोत, अशी माहिती नागपूर येथील वोक्हार्ट हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख श्री. रवी बागली यांनी दिली.
जागतिक किडनी दिन साजरा करताना आशा आणि आरोग्याचा संदेश पसरविण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखविला. आपल्या अंगदानाचा निर्णय अनेकांचे जीवन बदलणारा ठरू शकतो, त्यामुळे सर्वांनी एकजूट होत या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन रवी बागली यांनी केले.