
पंतप्रधान १० ऑगस्ट रोजी तीन वंदे भारत एक्सप्रेसला दाखवणार हिरवा झेंडा
अजनी (नागपूर) – पुणे वंदे भारत, बेंगलूरू – बेळगावी वंदे भारत आणि कटडा – अमृतसर वंदे भारत एक्सप्रेस
नागपूर : पंतप्रधान नरेन्द्र मोदी रविवार १० ऑगस्ट रोजी केएसआर बेंगळूरू रेल्वे स्थानकावरून अजनी (नागपूर)-पुणे वंदे भारत, केएसआर बेंगळूरू- बेळगावी वंदे भारत आणि श्री माता वैष्णोदेवी कटड़ा -अमृतसर वंदे भारत या ३ वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. या गाड्या केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू होतील.
अजनी (नागपूर) ते पुणे दरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन ही महाराष्ट्रातील १२वी वंदे भारत गाडी ठरणार आहे आणि वर्धा ते मनमाड दरम्यानच्या अद्याप सेवा न मिळालेल्या भागाला पहिल्यांदाच वंदे भारत ट्रेनची सेवा मिळणार आहे.
नागपूर आणि पुणे ही दोन्ही वेगाने विकसित होत असलेली महानगरे असून येथे अनेक लघु व मध्यम उद्योग, शैक्षणिक व वैद्यकीय संस्था, तसेच ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे आहेत.
नागपूर, ज्याला संत्र्यांचे शहर / उत्तम आरोग्यनगरी म्हणून ओळखले जाते आणि काहीवेळा महाराष्ट्राची हिवाळी राजधानी असेही संबोधले जाते, हे शहर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी जवळून निगडीत आहे. याठिकाणीच दीक्षाभूमी आहे, जिथे बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. ही बौद्ध श्रद्धाळूंसाठी एक प्रमुख तीर्थक्षेत्र असून दरवर्षी लाखो अनुयायी येथे भेट देतात. हे एक तीर्थक्षेत्रदेखील आहे, कारण रामटेक येथे प्रभु रामाचे प्राचीन मंदिर आहे. असे मानले जाते की वनवासाच्या काळात प्रभु राम काही काळ या ठिकाणी थांबले होते. याशिवाय येथे अन्य धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणेदेखील आहेत. शैक्षणिक केंद्र असण्याबरोबरच नागपूर हे वैद्यकीय सुविधांचे केंद्र (मेडिकल हब) देखील आहे. येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था तसेच इतर प्रतिष्ठित वैद्यकीय संस्था असून त्या संपूर्ण विदर्भातील रुग्णांना सेवा देत आहेत.
नागपूरला भारतातील वाघांची राजधानी असेही म्हटले जाते, कारण या परिसरात अनेक वन्यजीव अभयारण्ये आहेत.
पुणे, ज्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते, हे समृद्ध इतिहास लाभलेले शहर आहे. हे महान मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी घट्टपणे जोडलेले आहे. पुण्यातील लाल महाल हे त्यांचे वास्तव्याचे ठिकाण होते, तर शिवनेरी किल्ला हे त्यांचे जन्मस्थान आहे. याशिवाय या परिसरात अनेक किल्ले आहेत, जे त्यांच्या कार्यकाळाशी निगडीत आहेत. पुण्यात तत्कालीन पेशव्यांचे वास्तव्य असलेला प्रसिद्ध शनिवारवाडा देखील आहे. पुणे विविध प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांसाठी ओळखले जाते. तसेच हे एक तीर्थक्षेत्रदेखील आहे, कारण शहरात प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आहे आणि परिसरात आळंदी, जेजुरी यांसारखी धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणेही आहेत.
अजनी (नागपूर) ते पुणे दरम्यान वंदे भारत ट्रेन सेवेची सुरूवात या दोन शहरांदरम्यान तसेच मार्गावरील इतर शहरांमध्ये काम, व्यवसाय, शिक्षण आणि पर्यटनासाठी प्रवास करणाऱ्या मोठ्या संख्येने प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे. ही सेवा व्यावसायिक, विद्यार्थी, नोकरदार वर्ग तसेच नियमित प्रवास करणारे आणि विशेष दौर्यावर जाणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या सेवेच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळणार असून व्यापार व उद्योगांसाठी नव्या संधीही निर्माण होतील.
अजनी (नागपूर) – पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही आतापर्यंतची सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत ट्रेन असून ती ८८१ किमी अंतर कापणार आहे. ही महाराष्ट्रातील १२वी वंदे भारत गाडी असून वर्धा–अकोला– शेगाव– भुसावळ– जळगाव– मनमाड आणि पुणतांबा ते दौंड दरम्यानच्या भागात धावणारी पहिली वंदे भारत ट्रेन आहे. नागपूर ते पुणे दरम्यान धावणारी ही सर्वात वेगवान ट्रेन ठरणार असून तिचा सरासरी वेग ७३ किमी प्रतितास असेल आणि ती मार्गामध्ये १० स्थानकांवर थांबेल.
ही सेवा भारताच्या आधुनिक रेल्वे प्रवासातील प्रगतीचे प्रतीक असून प्रवाशांना अधिक जलद, आरामदायक प्रवासाचा अनुभव देत आहे. तसेच, देशाच्या कोपऱ्याकोपऱ्यापर्यंत सेवा पोहोचवण्याच्या रेल्वेच्या वचनबद्धतेचे हे उत्तम उदाहरण आहे.
पुणे- अजनी (नागपूर)- पुणे वंदे भारत एक्सप्रेसच्या नियमित सेवेची माहिती खालीलप्रमाणे आहे:
ट्रेन क्रमांक 26101 पुणे – अजनी वंदे भारत एक्सप्रेस ११.०८.२०२५ पासून दर आठवड्यात ६ दिवस (मंगळवार वगळता) पुणे स्टेशनवरून सकाळी ०६.२५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी १८.२५ वाजता अजनी येथे पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 26102 अजनी – पुणे वंदे भारत एक्सप्रेस १२.०८.२०२५ पासून दर आठवड्यात ६ दिवस (सोमवार वगळता) अजनी स्टेशनवरून सकाळी ०९.५० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २१.५० वाजता पुणे येथे पोहोचेल.
थांबे – वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौंड कॉर्ड लाईन.
संरचना – ८ कोच ज्यामध्ये १ एक्झिक्युटिव्ह चेअर कार (EC) आणि ७ चेअर कार (CC) यांचा समावेश आहे, ज्यामध्ये एकूण ५३० प्रवासी बसू शकतात (EC कोचमध्ये ५२ जागा, ५ सीसी कोचमध्ये प्रत्येकी ७८ जागा आणि लोको पायलटच्या कोचला जोडलेल्या २ सीसी कोचमध्ये प्रत्येकी ४४ जागा).
या गाड्यांच्या सविस्तर वेळापत्रक व थांब्यांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.
या कार्यक्रमात मा. पंतप्रधान केएसआर बेंगलूरू – बेळगावी वंदे भारत एक्सप्रेस आणि श्री माता वैष्णोदेवी कटड़ा – अमृतसर वंदे भारत एक्सप्रेसलाही हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करतील.
सध्या देशात ७२ वंदे भारत ट्रेन २४ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये धावत असून, या ट्रेनद्वारे प्रवाशांना सुरक्षित, आरामदायक आणि जलद प्रवासासाठी एकूण १४४ सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आगामी ३ वर्षांत भारतीय रेल्वे २०० पेक्षा अधिक वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा मानस ठेवत आहे.
वंदे भारत ट्रेनचे खास वैशिष्ट्ये – प्रवासी सुविधा
वातानुकूलित एसी: सर्व डबे वातानुकूलित प्रणालीने सुसज्ज
स्वयंचलित तापमान नियंत्रण: डब्यातील गर्दीच्या प्रमाणानुसार तापमान आपोआप समायोजित
बसण्याची व्यवस्था:
लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सोयीस्कर बसण्याची रचना (एर्गोनॉमिक डिझाइन)
लाइटिंग सिस्टिम : सर्व डब्यांमध्ये एलईडी व सौम्य लाइटिंग
दरवाजे: सर्व डब्यांमध्ये स्वयंचलित स्लायडिंग दरवाजे
खिडक्या: निसर्गदृश्य पाहण्यासाठी मोठ्या पॅनोरामिक खिडक्या
शौचालये: बायो -व्हॅक्यूम तंत्रज्ञानयुक्त स्वच्छ व आधुनिक शौचालये
वंदे भारत ट्रेनच्या संरक्षा सुविधा
आग सुरक्षा: आगीची वेळेवर सूचना व विझवण्याची यंत्रणा
सीसीटीव्ही निगराणी: संपूर्ण ट्रेनमध्ये कॅमेऱ्याद्वारे सतत देखरेख
आपत्कालीन संवाद: प्रत्येक डब्यात इंटरकॉम प्रणाली
ब्रेक प्रणाली: ३०% पर्यंत उर्जा वाचवणारी पुनरुउत्पादन ब्रेक प्रणाली
ड्युअल सस्पेन्शन प्रणाली: जास्त वेगातही आरामदायक प्रवास सुनिश्चित
‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत तयार झालेली ही वंदे भारत ट्रेन, भारताच्या प्रगत तंत्रज्ञान व आत्मनिर्भरतेच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. या ट्रेनचा शुभारंभ महाराष्ट्राला नवकल्पना व कनेक्टिव्हिटीचे केंद्र म्हणून अधिक बळकट करेल आणि प्रदेशाच्या सर्वांगीण विकासास चालना देईल.
हा कार्यक्रम ‘एक भारत – जोडलेला भारत’ या सरकारच्या दूरदृष्टीचा प्रतिबिंब आहे, ज्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आधुनिक रेल्वे पायाभूत सुविधांचा एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ ठरत आहेत.