नगर परिषद व नगर पंचायत निवडणूक, मतदानासाठी मतदारांनी शांततेत मतदान करण्याला दिले प्राधान्य
दुपारी 3.30 अखेर जिल्ह्यात 45.95 टक्के मतदान
शेवटच्या दोन तासात अनेक मतदारांनी मतदानासाठी दिली पसंती
नागपूर : जिल्ह्यातील 15 नगर परिषद व 12 नगर पंचायत अशा एकूण 27 नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदारांनी शांततेत आपला मतदानाचा हक्क बजावला. सर्व मतदान केंद्रांवर मतदानासाठी मतदारांना आवश्यक त्या सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात याची पुरेपूर खबरदारी निवडणूक विभागातर्फे घेण्यात आली.
प्रत्येक नगर परिषद व नगर पंचायत क्षेत्रात महिलांसाठी उभारण्यात आलेले विशेष पिंक बुथ हे मतदारांना वेगळा विश्वास देऊन गेले. दुपारी 3.30 वाजेपर्यंत एकूण 45.95 टक्के मतदानाची नोंद झाली. या निवडणुकांसाठी एकूण 3 लाख 35 हजार 377 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात पुरूष मतदरांची संख्या 1 लाख 68 हजार 378 तर स्त्री मतदारांची संख्या 1 लाख 66 हजार 999 इतकी आहे. मतदानाचा प्रारंभी सकाळी 7.30 ते 9.30 यावेळेत 7.95 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.
उमरेड नगर परिषद निवडणुकीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे सजविण्यात आलेल्या पिंक बुथ मध्ये लहान मुलांसाठी ठेवण्यात आलेली खेळणी, स्तनपान करण्यासाठी खास उभारण्यात आलेला हिरकणी कक्ष हा लक्षवेधी ठरला.
प्रत्येक नगर परिषद क्षेत्रात मतदारांनी शांततेत मतदान करण्याला प्राधान्य दिले. या मतदानासाठी जिल्ह्यात 853 मतदान केंद्र आवश्यक त्या सुरक्षिततेसह सज्ज करण्यात आले. सुमारे 6 हजार 250 अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक या निवडणुकीसाठी करण्यात आलेली आहे. एकूण 853 मतदान केंद्रावर सुमारे 1 हजार 776 बॅलेट युनिट तत्पर करण्यात आले आहे.


