विरोधक म्हणाले, ‘लाडक्या लेकी’ राज्यात असुरक्षित !
नागपूर : १८ वर्षांखालील ‘लाडक्या लेकीं’ राज्यात असुरक्षित आहेत. दररोज २४ अल्पवयीन मुलींची छेड किंवा अत्याचार केला जात आहे. सर्वात जास्त अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना मुंबई मध्ये घडल्या आहेत.
२०२५ या वर्षातही आतापर्यंत १००७ गुन्हे दाखल आहेत. फलटण येथील डॉ.मुंडे प्रकरणात भाजपच्या माजी खासदारांचे नाव आले त्यांना मुख्यमंत्र्यांनी क्लिनचीट दिली. तर संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजून पोलिसांना सापडला नाही. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात देखील पोलिसांवर कारवाई करण्यात आलेली नाही. यावरून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाने महार वतनाची जमीन नियमबाह्य पद्धतीने खरेदी केली. याप्रकरणी शीतल तेजवानी हिला अटक करण्यात आली. अधिवेशनाच्या तोंडावर कारवाई केली असल्याचे दाखविण्यासाठी अटक करण्यात आली. जमीन विकली त्यांच्यावर कारवाई झाली पण जमीन विकत घेणाऱ्यांवर कारवाई होत नाही हा महायुती सरकारचा अजब-गजब न्याय असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केली.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवार (७ डिसेंबर) रोजी झालेल्या बैठकीला काँग्रेस पक्षाकडून काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री नितीन राऊत , आमदार अभिजित वंजारी आणि प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भास्कर जाधव, सुनील प्रभू आणि अनिल परब उपस्थित होते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी मंत्री अनिल देशमुख उपस्थित होते.


