महाड सत्याग्रहाची शताब्दी : सामाजिक न्यायाची पुनर्कल्पना
विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागात सखोल चिंतन
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व विचारधारा विभागात “महाड सत्याग्रहाची शताब्दी : सामाजिक न्यायाची पुनर्कल्पना” या विषयावर एक दिवसीय परिसंवाद पार पडला. महाड सत्याग्रहाचे ऐतिहासिक, वैचारिक आणि समकालीन महत्त्व विविध मान्यवरांनी शुक्रवार दि. २० मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या परिसंवादात अधोरेखित केले.

माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित परिसंवादाच्या पहिल्या सत्रात राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विकास जांभूळकर यांनी महाड सत्याग्रहाचे महत्त्व स्पष्ट करताना १९२७ मधील हा लढा केवळ पाण्याच्या हक्कासाठी नव्हता, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय समतेचा पाया होता, असे सांगितले. २० मार्च हा दिवस “सामाजिक सक्षमीकरण दिन” आणि “पाणी दिन” म्हणून साजरा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आंबेडकरी चळवळ १९२७ पासून नव्हे, तर १९१६ पासून सुरू झाल्याचे सांगत त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेच्या कार्याचा उल्लेख केला. समानता, स्वाभिमान, आर्थिक स्वावलंबन, शिक्षण आणि आंतरजातीय विवाहांचे महत्त्व त्यांनी सांगितले. या सत्याग्रहादरम्यान झालेल्या हिंसाचारात १०० हून अधिक लोक जखमी झाले होते, असेही त्यांनी नमूद केले. या चळवळीचा प्रभाव भारतीय संविधानातील समानता, भेदभावास मनाई आणि अस्पृश्यतेचे उच्चाटन यांसारख्या तरतुदींमध्ये दिसून येतो, असे डॉ. जांभुळकर म्हणाले.
अध्यक्षीय भाषण करताना विभाग प्रमुख डॉ. अविनाश फुलझेले यांनी महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नव्हता, तर मानवी हक्क प्रस्थापित करण्याचा ऐतिहासिक प्रयत्न होता, असे सांगितले. सामाजिक न्यायाचा प्रश्न आजही तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. दुसऱ्या सत्रात डॉ. विद्या चौरपागर यांनी “महाड सत्याग्रहाची ऐतिहासिक व वैचारिक परिमाणे” या विषयावर विचार व्यक्त केले. महाड सत्याग्रहाला शोषित समाजाच्या स्वाभिमानाच्या लढ्याची सुरुवात असल्याचे त्यांनी सांगितले. वसाहत कालीन परिस्थिती आणि फ्रेंच राज्यक्रांतीतील समतेच्या मूल्यांच्या संदर्भात त्यांनी महाड चळवळीचे वैशिष्ट्य स्पष्ट केले. महाडची निवड सामाजिक विषमतेमुळे झाल्याचे सांगत त्यांनी या आंदोलनातून समतेची मूल्ये प्रत्यक्षात रुजली, असे नमूद केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात आत्मसन्मान, तर्कशुद्धता आणि आत्मविश्वास निर्माण केला, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन संगीता रामटेके यांनी केले, तर आभार अलका झारोंडे यांनी मानले. तिसऱ्या सत्रात डॉ. अजय चौधरी यांनी सामाजिक न्याय, पाण्याचा हक्क आणि आंबेडकरवादी दृष्टिकोन यावर सविस्तर मांडणी केली. समारोपीय सत्रात डॉ. उमेश उदापुरे यांनी “महाड सत्याग्रह ते आजचा भारत: धोरणे, कायदे व वास्तव” या विषयावर विचार व्यक्त केले. एकंदरीत, परिसंवादातून महाड सत्याग्रहाचे ऐतिहासिक आणि वैचारिक महत्त्व अधोरेखित करत सामाजिक न्यायाचा प्रश्न आजही तितकाच ज्वलंत असल्याचे स्पष्ट झाले.


